लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामीण भागात रुग्णांची त्वरित तपासणी करण्यासाठी अँटिजन चाचण्या करण्यात येत होत्या. मात्र, दोन आठवड्यांपूर्वी मोठ्या प्रमाणात या किटचा तुटवडा असल्यामुळे या चाचण्या रखडल्या होत्या. जुन्या पुरवठादाराने किंमत वाढवल्याने नव्या पुरवठादाराकडून २९ हजार ५२१ किट जिल्ह्यासाठी मिळाल्या होत्या. यातील १४ हजार ८३८ किट वापरले असून, १३ हजार ६८३ किट शिल्लक आहे.
जिल्ह्यात अँटिजन किटचा मोठा तुटवडा होता. जुन्या पुरवठादाराने दरवाढीची मागणी करून पुरवठा थांबविला होता. वाढीव किंमत देण्यासाठी आयसीएमआरने ठरवून दिलेल्या दरानुसार किट घेण्याचे ठरले होते. त्यानुसार नव्या पुरवठादारांचा शोध सुरू होता. जिल्हा आरोग्य विभागातर्फे १ लाख अँटिजन किट खरेदी करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यापैकी २९ हजार ५२१ किट जिल्ह्याला प्राप्त झाल्या होत्या. याचे वाटप जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना करण्यात आले आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता तातडीने निदान करण्यासाठी अँटिजन चाचण्यात करण्यात आल्या. यातील १४ हजार ८३८ किट आतापर्यंत वापरण्यात आल्या आहेत. मावळ तालुक्यात सर्वाधिक १ हजार ७२२ अँटिजन चाचण्या आतापर्यंत करण्यात आल्या आहेत.