- नितीन चौधरीलोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यातील १५ जिल्ह्यांमधील ३१ सहकारी व खासगी कारखान्यांनी मागील तीन वर्षात शेतकऱ्यांची तब्बल १ हजार ४८३ कोटी ८० लाख ११ हजार रुपयांची एफआरपी थकवली आहे. याप्रकरणी साखर आयुक्तालयाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना महसुली वसुली करण्याचे आदेश दिले आहेत. हे सर्व कारखाने राजकीय नेत्यांशी सबंधित असल्याने काय कारवाई होणार, याकडे लक्ष आहे.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे, सांगलीचे भाजपचे खासदार संजयकाका पाटील, काँग्रेसचे पुण्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे, गेवराईचे अमरसिंह पंडित, माजी मंत्री बबनराव पाचपुते यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते, मुंडे यांच्या मातोश्री प्रज्ञा मुंडे, साताऱ्यातील आमदार मकरंद पाटील अशा बड्या राजकीय नेत्यांच्या कारखान्यांचा यामध्ये समावेश आहे.
कारवाई होईल का?साखर आयुक्तालयाकडून आदेश आल्यानंतर सर्व निकष लावून एफआरपी वसुलीसाठी संबंधित कारखान्याची मालमत्ता जप्त करणे, कारखान्याला टाळे ठोकणे, कारखान्यातील साखर बाहेर न पाठवणे अशी कारवाई करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. मात्र, राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाई करणे शक्य होत नाही. आतादेखील कारवाई होईल की नाही, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
पंकजा मुंडे यांच्यामागे पुन्हा शुक्लकाष्ठपंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने गेल्या तीन वर्षांमध्ये ७४ कोटी ८६ लाख ९५ हजारांची एफआरपी थकवली आहे. गेल्याच महिन्यात त्यांच्या कारखान्याला १९ कोटींचा जीएसटी थकवल्याप्रकरणी नोटीस बजावली होती. त्यामुळे मुंडे पुन्हा एकदा अडचणीत आल्या आहेत.