लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य शासनाच्या निर्देशानुसार पुणे महापालिकेने महापालिका हद्दतील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये (राज्य, केंद्र आणि स्थानिक प्राधिकरणाच्या अखत्यारितील) अत्यावश्यक सेवेशी संबंधित कार्यालये वगळता सर्व कार्यालयांमध्ये केवळ १५ टक्के कर्मचारी उपस्थितीबाबतचे आदेश दिले आहेत. तसेच अत्यावश्यक सेवेतील कार्यालये ही देखील ५० टक्के कर्मचारी उपस्थितीतच सुरू ठेवण्याबाबत स्पष्ट केले आहे़
दरम्यान, महापालिका हद्दीत पूर्वनियोजित विवाह समारंभ जास्तीत जास्त २५ लोकांच्या उपस्थितीत व केवळ २ तासांच्या कालावधीतच तेही एकाच हॉलमध्ये संपन्न करावे असेही जाहीर केले आहे़ या आदेशाचे उल्लंघन केल्यास वर/वधू पक्षावर प्रत्येकी ५० हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. शिवाय संबंधित हॉल अथवा लग्न समारंभाचे ठिकाण यांना नियमांचे उल्लंघन केले म्हणून, कोविड-१० आपत्ती संपूर्णपणे संपली असे केंद्र शासन घोषित करीत नाही, तोपर्यंत त्या आस्थापनांना पूर्णंत बंदी घालणार आहे़ याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी जाहीर केले आहेत़
सदर आदेशात खासगी बस वगळता इतर सर्व खासगी प्रवासी वाहतूक (सर्व चारचाकी वाहने) आपत्कालीन व अत्यावश्यक कारणासाठी किंवा आसनक्षमतेच्या ५० टक्केच चालू ठेवण्यास परवानगी दिली आहे. तसेच या खासगी चारचाकी चालकांनी ज्या ठिकाणी राहतात त्याच शहरात वाहतूक करणे अपेक्षित आहे. आंतर-जिल्हा अथवा एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्यास मनाई केली आहे़ आंतर जिल्हा व शहर येथे प्रवास करताना केवळ वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग, कुटुंबातील व्यक्तींना गंभीर स्वरूपाचा आजार असल्यासच सवलत दिली आहे़ वरील आदेशाचे पालन न केल्यास संबंधिताकडून १० हजार रूपये दंड वसूल करणार आहे़