ऑनलाइन लोकमत -
बेल्हा (जुन्नर), दि. 04 - बोरी खुर्द येथील शेतकरी माजी ग्रामपंचायत सदस्य किरण धनंजय शेटे यांनी ज्वारीचे १५ गुंठे क्षेत्र पक्ष्यांसाठी सोडून दिले आहे. जवळच असलेल्या पाणी देण्याच्या असलेल्या पाइपाजवळील खड्ड्यात पक्ष्यांसाठी पिण्यासाठी पाणी सोडत आहेत.
येथे त्यांची शेती गावापासून जवळच असलेल्या शेटे मळा येथे आहे. जनावरांसाठी सर्वप्रथम त्यांनी या चा-याचा उपयोग होईल, असा विचार करून ज्वारीची पेरणी केली. थोडेफार पाणी उपलब्ध होते, त्यावरच पेरणी केली. ज्वारीचे पीकही जोमदार आले. मोठमोठी ज्वारीची कणसे आली. पक्ष्यांसाठी खाण्यासाठी उन्हाळ्यात खाद्य उपलब्ध व्हावे, असा निर्णय शेटे कुटुंबीयांच्या वतीने घेण्यात आला. त्यामुळे त्यांनी १५ गुंठे क्षेत्र पक्ष्यांसाठी सोडून दिले. त्यांना या १५ गुंठे शेतातून अंदाजे ६ ते ७ पोती ज्वारीचे उत्पादन मिळाले असते.
पक्ष्यांसाठी जवळच पिण्याच्या पाण्याची सोय केली. शेतातील सर्व ज्वारीचे पीक पक्ष्यांनी खाऊन टाकले आहे. या ज्वारीच्या पिकावर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत पक्षी धान्य खाण्यासाठी व पाणी पिण्यासाठी येत असल्याचे किरण शेटे यांनी सांगितले. ग्रामस्थांच्या वतीने व परिसरातूनही त्यांचे सर्वत्र कौतुक होतं आहे.