पुणे : कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे वाहतूक बंद असल्याने रस्त्यांवर खड्डेच पडले नव्हते. परंतु, मागील आठवडाभरापासून लागलेल्या पावसाने रस्त्यांवर खड्डे पडायला सुरुवात झाली आहे. गेल्या आठवड्याभरात पालिकेने जवळपास ८०० पेक्षा अधिक खड्डे बुजविले असून खड्डे बुजविण्याकरिता १५ क्षेत्रीय कार्यालय स्तरावर १५ वाहनांची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयांसाठी १५ कोटींच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. शहरात एकूण चौदाशे किलोमीटरचे रस्ते असून यातील एक हजार किलोमीटरच्या डांबरी रस्त्यांवर खड्डे पडत असल्याचे दिसते आहे. बहुतांश भागात खड्डे आणि रस्त्यांची बिकट अवस्था होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहनचालकांना यंदाही कसरत करतच वाहने चालवावी लागत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खड्डयांचे प्रमाण कमी असल्याचे पथ विभागाचे म्हणणे आहे. रस्त्यांच्या कामांच्या सुमार दर्जामुळे वारंवार रस्ते उखडणे, खड्डे पडणे आदी कामांकरिता वारंवार खर्च करावा लागत आहे. यासोबतच रस्त्याचे काम झाल्यानंतर ड्रेनेज, जलवाहिनी, विद्युतवाहिनी अथवा एमएनजीएलच्या गॅसवाहिनीसाठी रस्ता पुन्हा खोदावा लागतो. कामाचा दर्जा तपासण्यासोबतच हे काम वेळेत पूर्ण होईल हे पाहण्याची जबाबदारी क्षेत्रीय कार्यालय स्तरावर पार पाडली जाणे अपेक्षित आहे. रस्त्यांची दुरुस्ती, रिसर्फेसिंग, खड्डे बुजविणे आदी कामांकरिता पालिकेने १५ क्षेत्रीय कार्यालयांकरिता १५ कोटी रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयासाठी १ कोटी रुपये देण्यात आले आहेत. पावसाळ्यात बुजविलेले खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. त्यातील मालही वाहून जाऊ लागला आहे. पालिकेने वापरलेल्या केमिकलची 'कमाल' पावसाच्या तडाख्यात उघडी पडली आहे. पालिकेच्या पथ विभागासह प्रकल्प विभाग, वाहतूक विभाग, स्थानिक क्षेत्रिय कार्यालयांकडून रस्त्यांसह उड्डाणपूल, पुलांखालील रस्त्यांवर रिसरफेसिंग, रस्ते दुरुस्ती, पॅच वर्क, खड्डे दुरुस्तीची कामे सुरू आहेत.
शहरातील खड्ड्यांसाठी पालिकेकडून तब्बल १५ कोटी; आठवड्याभरात ८०० पेक्षा अधिक खड्डे बुजविल्याचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 8:31 PM
शहरात एकूण चौदाशे किलोमीटरचे रस्ते असून यातील एक हजार किलोमीटरच्या डांबरी रस्त्यांवर खड्डे
ठळक मुद्देगेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा खड्डयांचे प्रमाण कमी असल्याचे पथ विभागाचे म्हणणे आहेप्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला एक कोटी