पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील एका आमदाराच्या गाडीत खेड- शिवापूर टोल नाक्यावर १५ कोटी रुपये सापडले. यातील ५ कोटी पकडले; पण बाकीचे पैसे आमदारांच्या घरापर्यंत पोहचविले गेले, असा आरोप काँग्रेसचे आ. रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. निवडणूक आयोगाची यंत्रणाच सत्ताधाऱ्यांनी हायजॅक केली आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
खेड शिवापूर टोल नाक्यावर खासगी गाडीतून मोठ्या प्रमाणात रोकड जप्त केली. सुरुवातीला ही रक्कम १५ कोटी असल्याचे जाहीर केले होते. नंतर ५ कोटी असल्याचे सांगण्यात आले. याबाबत पत्रकारांशी संवाद साधत धंगेकर म्हणाले की, गाडी अडवल्यानंतर १५ कोटी सापडले होते. नंतर ५ कोटी असल्याचे सांगण्यात आले. यावेळी सर्व अधिकारी असताना कोणावरही कारवाई झाली नाही. उलट उर्वरित रक्कम आमदारांच्या घरी पोचवण्यात आली. निवडणूक यंत्रणा कुठे आहे? पंचनामा का झाला नाही? दोषींवर कारवाई का झाली नाही? कारमध्ये असलेल्या लोकांवर गुन्हा का दाखल झाला नाही? या सर्व प्रकरणात अडकलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी धंगेकर यांनी केली आहे.
पुण्याचे पोलीस राबवत आहेत भाजपचा अजेंडा
माझा मित्रपरिवार 'आनंदाची दिवाळी' नागरिकांना भेट म्हणून देतो. सर्वांच्या आनंदात सहभागी होणे, या भावनेने मित्रपरिवार दरवर्षी हा उपक्रम घेतो. यात मी स्वतः हजर नव्हतो, पैसे वाटत नव्हतो, तरीही माझ्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुण्याचे पोलिस भाजपचा अजेंडा राबवत आहेत, असा आरोपही रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.