------------
भोर : पावसाचा कहर केवळ गावात राहणाऱ्या नागरिकांना त्रासदायक ठरत नाही तर आईच्या पोटात असलेल्या बाळालाही आणि आईला अतिवृष्टीचा त्रास सहन करावा लागला आहे. भोर तालुक्यातील नीरा देवघर धरण खोऱ्यातील दुर्गम डोंगरी भागातील कुडली खुर्द गावातली महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. मात्र गावापर्यंत येणाऱ्या रस्त्यांवर दरडी कोसळल्याने गावाचा संपर्क तुटला व या महिलेला रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पोचविणे अशक्य झाले. गावातील नागरिकांनी त्यांना थेट डालात बसवून १५ किमीचा पायी प्रवास करत तिला रुग्णवाहिकेपर्यंत पोचविले व तेथून पुढे तिचा रुग्णवाहिकेतून रुग्णालयापर्यंत प्रवास झाला व तिची अखेर रुग्णालयात प्रसूती झाली. प्रवासाचा प्रचंड त्रास झाला असला तरी अखेर प्रसूती व्यवस्थित झाली व बाळ-बाळंतीण सुखरूप राहिले.
याबाबत अधिक माहिती अशी की, भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील हिर्डोशी खोऱ्यात सध्या मुसळधार पाऊस पडत असल्याने या भागातील भोर महाड भोर- दुर्गाडी या रिंगरोड रस्त्यावर मोठ्या दरडी कोसरळल्या आहेत, त्यामुळे या भागातील दहा गावांना जोडणारे रस्ते वाहनांसाठी बंद झाले. अशातच नीरा देवघर धरण भागातील व भोरपासून ४० किमी अंतर असलेल्या कुढली खुर्द येथील प्रियांका सुरेश वेणुपुरे (वय २४) या महिलेस प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या. त्यामुळे त्यांनी आंबवडे प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बोलावली. आंबवडेहून निघालेली रुग्णवाहिका कंकवाडीपर्यंत आली तेथून पुढे पऱ्हड गावाजवळ दरड कोसळली असल्याने रुग्णवाहिका तेथेच थांबून राहिली. इकडे प्रियंकाच्या प्रसूतीच्या कळा वाढत चालल्या त्यामुळे ग्रामस्थ व आशा सेविकेने प्रियंकाला रुग्णवाहिकेपर्यंत डालात (कोंबड्याचे खुराड्याप्रमाणे मोठी टोपली) बसवून नेण्याचे ठरवले. त्यानुसार आशासेविकेने महिलेची तपासणी केली व धोका पत्करत तिला डालात बसवून थेट पंधरा किमी पायी प्रवास सुरू केला. वाटेतील प्रचंड खराब रस्ता, दरड कोसळलेले खडक, चिखल गाळ तुडवत गावकऱ्यांनी तिला पऱ्हड गावापर्यंत पोचविले. पऱ्हड ते कंकडवाडीपर्यंत एका खासगी वाहनामध्ये तिला नेण्यात आले. तेथे पोचताच तिची परिचारिकेने तिची तपासणी केली रुग्णवाहिकेतून भोर येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे तिची सुखरुप प्रसूती झाली. प्रियंकासाठी पायी प्रवास करणारे गावकरी, आशासेविका मुक्ता पोळ आणि कंकडवाडीपर्यंत रुग्णवाहिकेत येणारे व प्रियंका तेथे येईपर्यंत तिची वाटप पाहणारे व तिला वेळीच पुन्हा भोर मध्ये पोचवेपर्यंत प्राथमिक उपचार सुरु ठेवणाऱ्या वाहन चालक दिलीप देवघरे, परिचार सुरेश दिघे व इतर कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
काही वेळाने प्रसूती झाली, बाळ व माता सुखरूप आहेत.
मुसळधार पाऊस पडत असतानाही रस्ता वाहून गेल्याने गाडीची सोय नाही. गावातील लोकांनी महिलेला चालत आणले तर आरोग्यसेविका आशासेविका चालक यांनी देवदूताप्रमाणे काम केल्याने आरोग्य विभागाच्या सेविकेचे, वाहनचालक, पुरुष परिचर, आशासेविका व ग्रामस्थांचे भागात कौतुक होत आहे.
--
चौकट
--
रिंगरोडवरील रस्त्याची दुरुस्ती लवकर करा नीरादेवघर धरणार्तगत असलेल्या रिंगरोडवर डोंगरातील मोठ मोठ्या दरडी पडल्या आहेत. यामुळे अनेक ठिकाणी रस्ता खचला आहे. दरडीमुळे वाहतूक बंद असल्याने १० गावांचा संपर्क तुटलेला आहे. लोकांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा नाहीत अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर रस्ते दुरुस्त करुन वाहतूक सुरळीत करण्याची मागणी नागरिक करत आहेत.
--
२७भोर महिला प्रसूती
फोटो ओळी : प्रसूती कळा आलेल्या महिलेला डालातून घेऊन जाताना ग्रामस्थ.