भोर (पुणे) : भोर तालुक्यातील नीरा देवघर धरण खोऱ्यातील दुर्गम डोंगरी भागातील कुडली खुर्द गावातील महिलेला प्रसूतीच्या कळा सुरू झाल्या; मात्र रस्त्यांवर दरडी कोसळल्याने गावाचा संपर्क तुटला होता. त्यामुळे नागरिकांनी तिला थेट डाल्यात (मोठी टोपली) बसवून १५ किमी पायी प्रवास करत तिला रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचविले. तेथून रुग्णालयापर्यंत रुग्णवाहिकेतून प्रवास झाला. महिलेची प्रसूती झाली बाळ-बाळंतिण सुखरूप आहेत.
भोरच्या पश्चिम भागातील हिर्डोशी खोऱ्यात मुसळधार पाऊस पडत आहे. भोर महाड भोर- दुर्गाडी या रिंगरोड रस्त्यावर मोठ्या दरडी कोसळल्या आहेत. त्यामुळे दहा गावांना जोडणारे रस्ते बंद झाले. अशातच कुढली खुर्द येथील प्रियांका सुरेश वेणुपुरे (२४) हिला प्रसूती कळा सुरू झाल्या. त्यांनी आंबवडे प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बोलावली. पऱ्हड गावाजवळ दरड कोसळली असल्याने रुग्णवाहिका पुढे येऊ शकली नाही. प्रसूती कळा वाढत चालल्यामुळे ग्रामस्थ व आशा सेविका मुक्ता पोळ यांनी प्रियंकाला डालात बसवून थेट पंधरा किमी पायी प्रवास सुरू केला. दरड कोसळलेले खडक, चिखल, गाळ तुडवत गावकऱ्यांनी तिला पऱ्हडपर्यंत पोहोचविले. पऱ्हड ते कंकडवाडीपर्यंत खासगी वाहनामध्ये नेण्यात आले. तेथे पोहोचताच परिचारिकेने तिची तपासणी केली. रुग्णवाहिकेतून भोर रुग्णालयात दाखल केले. तेथे तिची सुखरूप प्रसूती झाली.