पुणे : शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेस गुरूवार दि. २ मार्च पासून सुरूवात हाेणार आहे. यंदा राज्यातील नउ विभागीय मंडळातील ५ हजार ३३ केंद्रावर १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. दि. २ ते २५ मार्च या कालावधीत परीक्षा पार पडणार आहेत. यंदा बारावीसाेबतच दहावीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षेच्या निर्धारित वेळेपेक्षा दहा मिनिटे जास्त दिले जाणार आहेत अशी माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गाेसावी यांनी दिली.
राज्यातील पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, काेल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि काेकण या नउ विभागीय मंडळातील २० हजार १० शाळांमधील १५ लाख ७७ हजार २५६ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नाेंदणी केली आहे. परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी सकाळच्या सत्रात साडेदहा आणि दुपारच्या सत्रात अडीच वाजता किमान अर्धा तास अगाेदर परीक्षा केंद्रावर पाेहाेचावे. विद्यार्थ्यांना निर्धारित वेळेवर सकाळी ११ आणि दुपारी ३ वाजता प्रश्नपत्रिकेचे वितरण करण्यात येणार आहे.
विभागीय स्तरावर भरारी पथके
परीक्षेच्या कालावधीत काॅपीला आळा घालण्यासाठी मंडळामार्फत राज्यरात २७१ भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. यासाेबतच प्रत्येक जिल्ह्यांत जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता समिती कार्यरत आहेत. विभागीय मंडळानेही विशेष भरारी पथकांची स्थापना केली आहे.
पुणे मंडळात २ लाख ६८ हजार विद्यार्थी
मुंबई विभागीय मंडळातून सर्वाधिक ३ लाख ५२ हजार ४८० तर पुणे मंडळातून २ लाख ६८ हजार २०० विद्यार्थी ६३५ केंद्रांवर परीक्षा देणार आहेत. औरंगाबाद : १ लाख ८० हजार ५३८, नागपूर : १ लाख ५३ हजार ५१९, काेल्हापूर : १ लाख ३० हजार ६५३, अमरावती : १ लाख ६० हजार ३७०, नाशिक : १ लाख ९७ हजार २०६, लातूर : १ लाख ५ हजार ८३४ आणि काेकण : २८ हजार ४५६ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
परीक्षार्थी विद्यार्थी संख्या तक्ता
मुले : ८ लाख ४४ हजार ११६मुली : ७ लाख ३३ हजार ०६७