पुणे : राज्य मंडळाचा बारावी परीक्षेचा निकाल केव्हा जाहीर हाेणार ? या संदर्भात मागील अनेक दिवसांपासून चर्चांना उधाण आले हाेते. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी- मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च व माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल मंगळवार, दि. २१ मे रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर हाेणार आहे अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी दिली. परीक्षा दिलेल्या सुमारे १५ लाख विद्यार्थ्यांना निकालाची उत्सुकता लागली आहे.
बारावी परीक्षेचे दि. २१ फेब्रुवारी ते १९ मार्च २०२४ या कालावधीत आयोजन केले होते. राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत राज्यातील ३ हजार ३२० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. राज्यातील १० हजार ४९७ कनिष्ठ महाविद्यालयांतील १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली हाेती. त्यामध्ये ८ लाख २१ हजार ४५० विद्यार्थी व ६ लाख ९२ हजार ४२४ विद्यार्थिनींचा समावेश आहे.
या संकेतस्थळावर पाहता येतील गुण
विद्यार्थ्यांना दि. २१ राेजी मंगळवारी दुपारी १ वाजल्यानंतर १)mahresult.nic.in २) http://hscresult.mkcl.org ३) www.mahahsscboard.in ४) https://results.digilocker.gov.in निकाल आणि गुण पाहता येतील आणि गुणपत्रिकेची प्रतही (प्रिंट आउट) घेता येईल.