पुणे : परदेशात फिरायला घेऊन जाण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन अनेकांची १५ लाख ४६ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ट्रॅव्हल्स एजंटवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार फेब्रुवारी ते ऑगस्ट या कालावधीत हडपसर येथील डेक्कानंदिनी हॉलिडेज कार्यालयात घडला.
तुकाराम मल्हारी नरवडे (४८, खराडकर पार्क, खराडी) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात गुरुवारी फिर्याद दिली. त्यानुसार ट्रॅव्हल एजंट मिलिंद जोशी (रा. गंधर्व रेसिडेन्सी, भोसले गार्डन, हडपसर) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तुकाराम नरवडे यांच्यासह इतरांना देशात आणि परदेशात फिरण्यासाठी जायचे होते. आरोपी ट्रॅव्हल एजंट मिलिंद जोशी याने नरवडे व इतरांना फिरण्यास पाठवण्याच्या बहाण्याने तसेच परदेशी चलन बदलून देण्याच्या बहाण्याने वेळोवेळी १५ लाख ४६ हजार १९९ रुपये घेतले. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक कुदळे करत आहेत.