पुणे: जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर विद्यार्थ्यांना घेऊन जात असलेल्या एसटी बसला अपघात झाला आहे. यामध्ये बसमधील १५ विद्यार्थी, ३ शिक्षक आणि चालक जखमी झाले आहेत. विद्यार्थी सहलीवरुन परतत असताना पहाटे चारच्या सुमारास तळेगाव दाभाडे परिसरात एसटीला अपघात झाला. रस्त्याच्या मधोमध बंद पडलेल्या ट्रॅक्टरला बसनं धडक दिल्यानं ही दुर्घटना घडली. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मधोमध बंद पडलेल्या ऊसाच्या ट्रॉलीला भरधाव एसटी बसनं पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं ऊसाची ट्रॉली महामार्गावर उलटली. या अपघातात एसटी बसमधील एकूण 44 विद्यार्थ्यांपैकी 15 विद्यार्थी तसेच 3 शिक्षक गंभीररित्या जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेले विद्यार्थी संगमनेर तालुक्यातील बी. जे. खताळ विद्यालय, धांदरफळ येथील आहेत. अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थी आणि शिक्षकांना उपचारासाठी महामार्गालगत असलेल्या पवना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर एसटी बस बंद पडली, तर ट्रॅक्टर ट्रॉलीतील ऊस महामार्गावर पसरला. त्यामुळे मुंबईवरून पुण्याकडे जाणारा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे. पर्यायी मार्ग म्हणून एकाच बाजूने वाहनांची ये-जा सुरू आहे. घटनास्थळी तळेगाव दाभाडे पोलीस दाखल झाले आहेत.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर एसटी बसला अपघात; 15 विद्यार्थ्यांसह 3 शिक्षक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 7:39 AM