पुणे : जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) फसवणूक व अपहार प्रकरणात पुणे पोलीस दलाच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी जळगाव, धुळे, औरंगाबाद, मुंबई आणि पुणे शहरात एकाच वेळी १५ पथकांच्या मार्फत कारवाई केली असून १२ जणांना ताब्यात घेतले आहे.
मद्य व्यावसायिक भागवत भंगाळे, जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती छगन झाल्टे(रा. जामनेर), जामनेर शिक्षण संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील, राजेश लोढा (रा. जामनेर), अंबादास मानकापे (रा. औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला, संजय तोतला (रा. मुंबई), प्रमोद कापसे (रा. अकोला), प्रितेश चंपालाल जैन (रा. धुळे), असिफ मुन्ना तेली (रा. भुसावळ), प्रेम नारायण कोगटा (रा. जळगाव) यांचा ताब्यात घेतलेल्यांमध्ये समावेश आहे.
पोलिसांनी ताब्यात घेतेले हे आरोपी मातब्बर असून, त्यातील काहींची राजकीय पार्श्वभूमी तर काही मोठे व्यवसायिक आहेत. भागवत भंगाळे हे हॉटेल व्यावसायिक असून, २५ पेक्षा अधिक त्यांच्या बिअर शॉपी आहेत. दारू विक्रीचा प्रमुख वितरक आहे. नातेवाईकांबरोबर स्वता:ची देखील राजकीय पार्श्वभूमी आहे. छगन झाल्टे हे जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती असून नगरसेवक देखील होते. जितेंद्र पाटील हे शिक्षण सम्राट असून, पत्नी नगरसेविका तसेच ते जामनेर तालुका शिक्षण संस्थेचे पदाधिकारी आहेत़ भुसावळ येथील आसिफ तेली हे माजी नगरसेवक आहे. जयश्री मणियार या प्लास्टो चे प्रमुख उद्योगपती श्रीकांत मणियार यांची सुन आहेत. संजय तोतला हे जळगाव स्थित मोठे व्यवसायिक आहेत. प्रेम कोगटा हे जळगाव येथील दाल मिल असोसिएशनचे पदाधिकारी असून, मोठे व्यावसायिक आहेत. राजेश लोढा शिक्षण संस्थेचे संचालक आहेत. प्रितेश जैन भुसावळ येथील व्यावसायिक आहेत. अंबादास मानकापे हे औरंगाबद स्थित व्यावसायिक असून, एका दैनिकाचे मालक अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची पार्श्वभूमी आहे.
पुणे शहरातून १६ गाड्यांतून १५ पथके बुधवारी दुपारी पुण्यातून वेगवेगळ्या शहरात रवाना झाले होते. त्यांना गुरुवारी सकाळी ६ वाजता नेमून दिलेल्या ठिकाणी पोहचण्यास सांगण्यात आले होते. त्यानंतर गुरुवारी सकाळी ६ वाजता एकाचवेळी वेगवेगळ्या शहरात पोलिसांच्या या पथकांनी छापेमारी सुरु केली. सुमारे २ तासात सर्वांना ताब्यात घेण्यात आले.
बीएचआर पतसंस्थेचे आवसायक जितेंद्र कंडारे यानेच आवसानीत काढण्यात आलेल्या पतसंस्थेत मोठा गैरव्यवहार करुन भ्रष्टाचार केला. त्यात त्याने अनेकांना त्यांच्या ठेवीच्या ३० ते ४० टक्के पैसे देऊन त्यांना १०० टक्के पैसे मिळाल्याचे लिहून घेतले. आज पकडण्यात आलेल्यांनी बीआरएच पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या बदल्यात ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या ३० ते ४० टक्के पैसे देऊन त्यांना १०० टक्के पैसे परत केल्याचे दाखविले. व त्यातून आपले कर्ज परतफेड केल्याचे दाखविले होते.
पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जळगाव मध्ये एकाचवेळी अनेक ठिकाणी कारवाई केली होती. त्यातून बीएचआर पतसंस्थेमधील घोटाळ्यातील अनेक जणांना पकडण्यात आले होते. तसेच मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे हस्तगत करण्यात आली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगाव जिल्ह्यात अनेक वेळा कारवाई केली आहे. नोव्हेंबर प्रमाणेच आज पुन्हा एकदा मोठी कारवाई पुणे पोलिसांनी केल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
त्यापैकी मुंबई, पुणे आणि औरंगाबादमधून ताब्यात घेतलेल्या चौघांना आज पुण्यात आणून अटक केली असून त्यांना सायंकाळी उशिरा न्यायालयात हजर करण्यात आले आहे. १०० कोटींचा गैरव्यवहारपोलिसांनी ताब्यात घेतलेल्या १२ जणांकडील कर्ज व त्यांनी ठेवीदारांचा केलेला विश्वासघात याची रक्कम सुमारे १०० कोटी रुपयांपर्यंत आल्याचे आजवरच्या तपासात पुढे आले आहे. पहिल्या कारवाईच्या वेळीही आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने छापे घालेपर्यंत कोणाला याचा सुगावा लागू दिला नाही. त्याचप्रमाणे यावेळीही ही पथके त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणापासून काही अंतरावर रात्रीच पोहचली होती. एका पथकात १ अधिकारी व ४ कर्मचार्यांचा समावेश होता. या सर्व पथकांना पुण्यात बसून पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके व त्यांचे सहकारी रात्रभर मार्गदर्शन करत होते.