आळंदी : येथील गणपती मिरवणुकीचे खास आकर्षण ठरला तो ढोलताशाचा गजर आणि हरिनाम जयघोषात आळंदीत बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. इंद्रायणी नदीच्या दुतर्फा यासाठी गणेशभक्तांनी मोठी गर्दी केली होती. आळंदीत याही वर्षी भाविकांनी गणेशमूर्ती दान करण्यास प्रतिसाद दिल्याने आळंदी नगर परिषदेकडे १५ हजार गणेशमूर्ती दान मिळाल्या.पारंपरिक ढोलताशा आणि शिस्तबद्ध वाजतगाजत मिरवणुका आणि गुलाल, भंडाराची मुक्त उधळण करीत श्रीना पुढच्या वर्षी लवकर या असे म्हणत निरोप भक्तिमय उत्साहात देण्यात आला.बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणांसोबतच नागरिक, कार्यकर्ते यांनी जनजागृती केली. विसर्जनानंतर श्रींचे मूर्ती तात्काळ नगरसपरिषदेने इंद्रायणी बाहेर काढत दान म्हणून भक्तांकडून गणेश मूर्ती स्वीकारल्या. यावर्षीही उत्तम प्रतिसाद मिळाल्याचे मुख्याधिकारी समीर भूमकर यांनी सांगितले.अनंत चतुर्दशीच्या दिवशी विसर्जन लवकर व्हावे, याकरिता आळंदी पोलिस ठाण्याचे वतीने नियोजन करून मंडळ पदाधिकारी यांना आवाहन करण्यात आले होते. भाविकांनी निर्माल्य कुंडात देत नदी प्रदूषण रोखण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला.जय गणेश मंडळाचे श्रींचे विसर्जनाने सांगता झाली. पालिकेने निर्माल्यासाठी घंटा गाड्या सेवा रुजू केली. पोलिसांनी नियोजन केले. मुख्याधिकारी समीर भूमकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र चौधर, मंडलाधिकारी चेतन चासकर, आपत्ती निवारण यंत्रणा यांनी घाटावर सुरक्षा यंत्रणा विकसित केली.पोलिसांना सहकार्यआळंदी परिसरातील विसर्जन मिरवणुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी पोलीस आणि वाहतूक पोलिसांना सहकार्य करण्यासाठी पोलीस मित्र, नागरिक, कार्यकर्ते यांनी मदत केली. जय गणेश प्रतिष्ठान, शिवतेज मित्र मंडळ, शिवस्मृती प्रतिष्ठान, अखिल भाजी मंडई मंडळ, हनुमान मित्र मंडळ, ज्ञानराज मित्र मंडळ, पद्मावती मित्र मंडळ, नवशिवशक्ती मित्र मंडळ, राजे शिवछत्रपती मित्र मंडळ आदी सार्वजनिक गणेश मंडळांनी या वर्षी उत्सव साजरा केला.
आळंदीत १५ हजार गणेशमूर्ती दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 1:49 AM