मंचर : आदिवासी समाजातील १५ वर्षांच्या गरीब मुलीच्या पोटातील १० किलोंची गाठ तब्बल ९ तास शस्त्रक्रिया करून काढत मंचर उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला जीवदान दिले आहे. या मुलीवरील अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली. अनु गजू माळी असे या जीवनदान मिळालेल्या मुलीचे नाव आहे. डॉक्टरांच्या या कामाचे कौतुक केले जात आहे. ही दुर्मिळ शस्त्रक्रिया समजली जात आहे.उपजिल्हा रुग्णालय ‘रुग्णांनी गजबजलेले’ अशीच दुपारची वेळ. डॉ. अंबादास देवमाने आपल्या ओ. पी. डी.मध्ये रुग्ण तपासत होते. समोर एक मध्यमवयीन महिला आपल्या मुलीसोबत तपासणीसाठी उभी होती. डॉ. देवमाने यांनी काय झाले, असे विचारता मध्यमवयीन महिलेने मुलीकडे पाहिले. १५ वर्षांची मुलगी गरोदर असावी, असे पोट वाढलेले, हातात काही रिपोर्ट होते. देवमाने यांनी काळजीपूर्वक रिपोर्ट पाहून तिला तपासले. पोटात मोठी गाठ असल्याची शक्यता वर्तविली. अनेक तपासण्यांची आवश्यकता असल्याचे सांगून पुढील तपासणी व उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला.महिला निमूटपणे मुलीला घेऊन बाहेर आली, पण तिच्या डोळयात पाणी आले होते. क्षणभर देवमानेही स्तब्ध झाले, पण काय करावे हा प्रश्न समोर होता. याचवेळी डॉ. गणेश पवार यांनी त्या महिलेला पाहिले. चौकशी केली तेव्हा महिलेने सांगितले, की मुलीला घेऊन खूप दवाखाने फिरले. पण हिच्या आजारावर काही इलाज झाला नाही. आशेने मी येथे आले; परंतु, हिचे आॅपरेशन मोठ्या रुग्णालयात करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. पण मी हिला घेऊन कोठेही जाणार नाही. माझी मुलगी आणि तिचे नशीब असे म्हणून ती महिला रडायला लागली. डॉ. पवार यांनी डॉ. देवमाने यांच्याशी चर्चा केली. लवकर उपचार नाही केले तर मुलीच्या जीवाला धोका होता. डॉ. पवारांनी डॉ. देवमाने यांना विचारले, की तुम्ही आॅपरेशन करू शकाल. डॉ. देवमाने यांनीही लागलीच होकार दिला. पण तपासण्याची आवश्यकता आहे, असे सांगितले. त्यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सीमा देशमुख यांच्याशी चर्चा केली. रुग्णास अॅडमिट करण्यात आले. अनेक अडचणी समोर होत्या. तपासणी करून रोगनिदान करणे, रुग्णांची शस्त्रक्रियेपूर्वीची तपासणी करणे गरजेचे होते. डॉ. पवार यांनी रुग्ण कल्याण समितीच्या माध्यमातून तपासण्या उपलब्ध करून दिल्या. डॉ. पी. एस. करमरकर व डॉ. पी. व्ही. रनबागले यांचे मार्गदर्शन घेतले. डॉ. सदानंद राऊत यांनी रुग्ण तपासून हिरवा कंदिल दिला. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. संजयकुमार भवारी, डॉ. वृषाली जाधव यांना मदतीला घेतलेशस्त्रक्रिया चालू होती रुग्णाच्या शरीरातील सर्व अवयव प्रचंड अशा गाठीमुळे इतरत्र विखुरलेले होते. बरेचसे अवयव गाठीला चिकटले होते. डॉ. देवमाने एक एक अवयव गाठीपासून अलग करीत होते. खूप वेळ लागत होता. शेवटी डॉ. देवमाने यांनी तिच्या शरीरातून ९.६० किलोचा गोळा बाजूला केला. भूलतज्ज्ञांनी अत्यंत शिताफीने हा क्षण सांभाळला. शस्त्रक्रियेच्या जखमा भरून आज ती मुलगी बोलायला, चालायला लागली. तिच्या नवीन आयुष्याची सुरुवात झाली. मुलीची प्रकृती उत्तम आहे.
१५ वर्षांच्या मुलीच्या पोटातील १० किलोंची गाठ काढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 1:34 PM
१५ वर्षांची मुलगी गरोदर असावी, असे पोट वाढलेले, हातात काही रिपोर्ट होते. डॉक्टरांनी काळजीपूर्वक रिपोर्ट पाहून तिला तपासले. पोटात मोठी गाठ असल्याची शक्यता वर्तविली.
ठळक मुद्देमंचर उपजिल्हा रुग्णालय : तब्बल ९ तास शस्त्रक्रिया