Amol Kolhe: १५ वर्षे सत्ता, पर्वतीत एकतरी काम दाखवा; अमाेल कोल्हेंचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2024 13:34 IST2024-11-10T13:33:51+5:302024-11-10T13:34:29+5:30
महिला आमदार असूनही १५ वर्षांत एकाही महिलांच्या सबलीकरणासाठी काम नाही

Amol Kolhe: १५ वर्षे सत्ता, पर्वतीत एकतरी काम दाखवा; अमाेल कोल्हेंचा घणाघात
पुणे : महाविकास आघाडी जाहीरनाम्यातील सर्व आश्वासन पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. आरोग्य विमा, लाडकी बहीण योजना यामध्ये मोठी वाढ घडविण्यासाठी बदल घडवा. गेली १५ वर्षे विद्यमान आमदारांची एकहाती सत्ता असतानासुद्धा एकतरी काम पर्वती मतदारसंघात दाखवा. महिला आमदार असूनही १५ वर्षांत एकाही महिलांच्या सबलीकरणासाठी काम नाही, असे घणाघाती आराेप खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी केला आणि पर्वतीत बदल घडविण्याचे नागरिकांना आवाहन केले.
पर्वती विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडी व इंडिया फ्रंटच्या उमेदवार अश्विनी कदम यांच्या प्रचारार्थ परिसरात बाइक रॅली पार पडली. ही रॅली व्हीआयटी हाेस्टेल चौकापासून सुरुवात होऊन भव्य सभा राम मंदिर चौक जनता वसाहत येथे तिचा समाराेप झाला. यावेळी झालेल्या सभेत खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी मार्गदर्शन केले. छावा स्वराज्य सामाजिक संस्था, आरपीआय (आंबेडकर), महाराष्ट्र बँड कलाकार उत्कर्ष संघटना तसेच अपक्ष उमेदवार रवींद्र क्षीरसागर यांनी मताचे विभाजन होऊन ध्रुवीकरण होऊ नये, यासाठी पाठिंबा जाहीर केला.
पर्वतीकरांचा मलाच भक्कम पाठिंबा : कदम
या प्रचाराच्या रणधुमाळीत पर्वतीकरांनी प्रचंड प्रेम आणि पाठिंबा दाखवला. एवढा जनसमुदाय पाठीशी असल्यावर पर्वतीत बदल नक्कीच घडणार याची आज पुन्हा खात्री झाली. पर्वती विधानसभा मतदारसंघातील जनतेशी संवाद साधताना माझे कार्यकर्ते आणि माझे पर्वतीकर नागरिक हेच माझा अभिमान आहेत. त्यांचा भक्कम पाठिंबा मला विजयी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल असा विश्वास अश्विनी कदम यांनी व्यक्त केला.