पुणे: केंद्र सरकारच्या फेम २ या शहरातील सार्वजनिक वाहतूकीसाठी अर्थसाह्य करणार्या योजनेतून पुण्यासाठी १५० इलेक्ट्रिक बस मिळणार आहेत. महापालिका ३०० बस घेत आहे, केंद्र सरकार १५० बससाठी साह्य करत आहे, राज्य सरकारकडून मात्र काहीच मिळायला तयार नाही अशी टीका याबाबत माहिती देताना खासदार गिरीश बापट यांनी केली.
पीएमपीएलच्या मुख्यालयात खासदार बापट यांनी या खरेदीची माहिती दिली. महापौर मुरलीधर मोहोळ, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, पीएमपील संचालक शंकर पवार, व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यावेळी ऊपस्थित होते.
केंद्र सरकारने पुणेकरांना दिलेला दिलासा असे वर्णन करून बापट म्हणाले, राज्य सरकार मात्र कसली मदत करत नाही, पण आम्ही त्यांच्याकडेही मदतीची मागणी करणार आहोत. इंधनाचा कमी होत जाणारा साठा व शहरांमधील वाढते प्रदूषण यावर पर्याय म्हणून केंद्र सरकार देशातील काही शहरांंना ही मदत देत आहे. एका बसची किंमत दीड कोटी आहे. त्यातील ५५ लाख रूपये सरकार अनूदान देणार आहे. एकूण १५० बस खरेदी होतील. खासगी कंपनीकडून ही खरेदी होईल. अनूदान त्यांंना मिळणार आहे. बसचा चालक, दुरूस्ती खर्च कंपनीकडे असेल. त्या बदल्यात त्यांना ६३ रूपये ९५ पैसे प्रतिकिलोमीटर भाडे देण्यात येईल. विद्यूत खर्च पीएमपीएल करेल.
'पीएमपी'कडून ऑलेक्ट्रा ग्रीनटेक आणि एव्ही ट्रान्स प्रायव्हेट लिमिटेड यांना १५० इलेक्ट्रिक बस पुरवण्यासाठीची ऑर्डर मिळाली आहे. एव्ही ट्रान्स या 150 इलेक्ट्रिक बसेस ऑलेक्ट्रा ग्रीनटेककडून खरेदी करणार आहे.आगामी एक वर्षाच्या कालावधीत ह्या सर्व बसेस वितरीत केल्या जाणार आहे.तसेच कराराच्या कालावधीत इलेक्ट्रिक बसेसची देखभाल देखील हीच कंपनी करणार आहे.
व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी बसची तांत्रिक माहिती दिली. या बस बीआरटी मार्गावर चालवण्यात येतील. ३७ आसनक्षमता असणाऱ्या या बस संपुर्ण वातानुकुलित असतील. त्यापासून प्रदुषण होणार नाही. महापौर मोहोळ म्हणाले, बस खरेदी करण्याची मुदत संपली होती. ती वाढवून घेण्यात आली. आता करार वगैरे झाले असून एप्रिपासून बस यायला सुरूवात होईल. उपलब्घ होतील त्याप्रमाणे त्यांचा वापर करण्यात येणार आहे.
महापालिका पेठांमधील मध्यवर्ती भागात गोलाकार फिरणाऱ्या ३०० बस खरेदी करणार आहे. त्याचे दिवसभराचे तिकीट १० रूपये असेल. कोरोना आपत्तीमुळे या सगळ्या प्रक्रियेस विलंब झाला. मात्र आता प्रक्रिया पूर्ण झाली असून याही बस पीएमपीएलच्या ताफ्यात हळूहळू दाखल होतील.हेमंत रासने, स्थायी समिती अध्यक्ष,
या इलेक्ट्रिक बसेसची वैशिष्ट्ये... पीएमपीच्या लवकरच दाखल होणाऱ्या बसेसमध्ये प्रवाशांना सुखसोयीसाठी या 12 मीटर लांबीच्या वातानुकूलित बसेसमध्ये इलेक्ट्रॉनिक्स नियंत्रित एअर सस्पेंशन आहे. तसेच बसण्यासाठी 33 आसने व्हीलचेअर चालक अशी सोय आहे. तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, व्हीलचेअर, आपत्कालीन बटन, मोबाइल चार्जिंगसाठी यूएसबी सॉकेट्स ची व्यवस्था करण्यात आली आहेत.