लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यात खेड आणि बारामती तालुक्यात काही गावांमध्ये लाळ खुरकुत रोगाची लागण अनेक जनावरांना झाली आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने तातडीने लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. परंतु या रोगामुळे जनावर दगावल्यास शेतक-यांचे मोठे नुकसान होते. यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने एक जनावरासाठी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा अध्यक्षा निर्मला पानसरे व कृषी सभापती बाबूराव वायकर यांनी आज केली.
लाळ खुरकत या रोगामुळे पशुधनाचे मोठे नुकसान होते. त्याचा विचार करुन केंद्र व राज्य शासनाच्या मदतीने जिल्हयातील सर्व पशुधनास लाळ खुरकत रोगाविरुद्ध प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे नियोजित केले आहे.
पुणे जिल्ह्यामध्ये एकूण 17,56,064 इतके पशुधन असून , त्यापैकी गाय व म्हैस वर्ग पशुधन 10,99,344 पशुधन आहे. जिल्ह्यात एक सप्टेंबरपासून लाळ खुरकुत रोगाविरुद्ध प्रतिबंधात्मक लसीकरण करण्यात येणार आहे. या लसीकरण कार्यक्रमाकरीता आवश्यक एकूण 10,31,000 लस मात्रा पुणे जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या असल्याचे वायकर यांनी सांगितले.
याशिवाय जिल्हा वार्षिक योजनेमधून आवश्यक औषधांचा पुरवठा सर्व तालुक्यांना करण्यात आला आहे. तसेच औषधे खरेदीसाठी तालुकास्तरावर निधी वाटप केलेला आहे. लम्पी आजारासाठी जिल्हा परिषदेने लस खरेदी केली असून, ती तालुक्याला उपलब्ध केली आहे. पशुसंवर्धन विभागातील सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचे वायकर यांनी स्पष्ट केले.