पुणे : लॉकडाऊनच्या काळात सुरू करण्यात आलेल्या मुंबई ते चेन्नई पार्सल विशेष एक्सप्रेसने मागील तीन महिन्यांत तब्बल १५ हजार टनांहून अधिक साहित्य पाठविले आहे. त्यामध्ये औषधे, वैद्यकीय उपकरणे, खाद्यान्न, भाजीपाला, ई-व्यापार सामान आदीचा समावेश आहे. या गाडीला आता डिसेंबरअखेरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.कोरोनामुळे देशात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर पार्सल सेवाही ठप्प झाली. यापार्श्वभुमीवर नागरिकांना अत्यावश्यक वस्तु उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने रेल्वेने एप्रिल महिन्यात देशभरातील काही शहरांदरम्यान विशेष पार्सल गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मुंबई ते चेन्नईदरम्यानही गाडी सुरू करण्यात आली. ही गाडी प्रत्येक सोमवार व शुक्रवारी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सायंकाळली ७.३५ वाजता सुटून रात्री १०.४५ वाजता पुण्यात येते. तर दुसऱ्या दिवशी रात्री ११.२५ वाजता चेन्नई सेंट्रल स्थानकात पोहचते. चेन्नई येथून प्रत्येक बुधवार आणि रविवारी दुपारी १२.३० वाजता निघून दुसऱ्या दिवशी दुपारी ४.२० वाजता मुंबईत येते. ही गाडी पुण्यासह कल्याण, लोणावळा, सोलापुर, वाडी, सिकंदराबाद, विजयवाडा व गुडूर या स्थानकांवर थांबते. रेल्वेने ही गाडी डिसेंबर अखेरपर्यंत सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष पार्सल एक्सप्रेसला नागरिक, व्यवसायिक, खासगी कंपन्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मागील तीन महिन्यांत जून अखेरपर्यंत या गाडीने १५ हजार ६०० टनांचे पार्सल पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये ४ हजार ४४५ टनांचे खाद्यान, भाजीपाला आदीचा समावेश आहे. तसेच १ हजार ३४४ टनांची औषधे व वैद्यकीय साहित्यही पाठविण्यात आल्याने दिलासा मिळाला. ऑनलाईन खरेदी विक्री सुरू झाल्यानंतर तसेच पत्रव्यवहार सुरू झाल्यानंतर, ई-व्यापार आदीच्या २११ टन वस्तुंचीही यागाडीने पाठविण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.-------------पार्सल कार्गो एक्सप्रेसने केलेली वाहतुक (३० जूनपर्यंत)औषधे, वैद्यकीय साहित्य - १,३४४ टनअन्नधान्य, भाजीपाला - ४,४४५ टनपत्र, ई-व्यापार वस्तु - २११ टनइतर साहित्य - ९,६०० टनएकुण - १५,६०० टन------------------