पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागात तोडफोड तसेच पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या १५५ जणांना पोलिसांकडून अटक करण्यात आली. आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पाच पोलीस जखमी झाले. त्यापैकी एका पोलिसाला गंभीर दुखापत झाली आहे. बंदला गुरुवारी हिंसक वळण लागले. चांदणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांनी पोलिसांना धक्काबुक्की केली. काही तरुण सुरक्षारक्षकाच्या खोलीच्या छतावर चढले आणि त्यांनी घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. चांदणी चौकात पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडून जमाव पांगवलो. डेक्कन येथील खंडुजीबाबा चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले. पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळ्यानजीक ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. आंदोलकांनी पीएमपी बस तसेच काही दुकानांवर दगडफेक केली. शहराच्या वेगवेगळ्या भागात हिंसक आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांकडून १५५ जणांना अटक करण्यात आली. बंडगार्डन, सिंहगड, येरवडा, कोथरूड, येरवडा पोलीस ठाण्यात वेगवेगळे अठरा गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी दहा गुन्हे कोथरूड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. दंगल करणे, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे, सरकारी कार्यालयासमोर दहशत निर्माण करणे या कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पुण्यात महाराष्ट्र बंद दरम्यान तोडफोड करणा-या १५५ जणांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 8:14 PM
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये शहराच्या वेगवेगळ्या भागात तोडफोड तसेच पोलिसांवर दगडफेक करणाऱ्या १५५ जणांवर बंडगार्डन, सिंहगड, येरवडा, कोथरूड, येरवडा पोलीस ठाण्यात वेगवेगळे अठरा गुन्हे दाखल करण्यात आले.
ठळक मुद्देचांदणी चौक, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांची पोलिसांना धक्काबुक्की