पुणे : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी यंदा सुमारे ९४ हजार ५०० जागा उपलब्ध असून, मागील वर्षीच्या तुलनेत तब्बल १५ हजार जागांची वाढ झाली आहे. येत्या शैक्षणिक वर्षासाठी नवीन २४ कनिष्ठ महाविद्यालयांना मान्यता मिळाल्याने प्रवेशक्षमता वाढली आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील इयत्ता अकरावी प्रवेशाची आॅनलाईन प्रक्रिया केंद्रीय प्रवेश समितीमार्फत राबविली जाते. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मधील प्रवेश प्रक्रियेसाठी कनिष्ठ महाविद्यालयांची समितीकडे नोंदणी करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या मुदतीत २६७ महाविद्यालयांची नोंदणी झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा २४ महाविद्यालये वाढली आहे. या महाविद्यालयांमधील ५८४ तुकड्यांमध्ये एकूण ९४ हजार ५८० प्रवेशक्षमता आहे. एकूण अल्पसंख्यांक महाविद्यालयांची संख्या ४८ असून, २० हजार ४९५ प्रवेश क्षमता आहे. मागील वर्षी अकरावीचे प्रवेश सुरू असतानाच काही महाविद्यालयांना नव्याने मान्यता मिळाली होती. मात्र, प्रवेशप्रक्रिया बरीच पुढे गेल्याने या महाविद्यायांमध्ये प्रवेश देण्यात आले नाहीत. तसेच काही तुकड्यांनाही मान्यता मिळाली होती. काही नवीन तुकड्यांमध्ये विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया राबविण्यात आली होती. मागील वर्षी एकूण ७९ हजार ६६५ प्रवेश उपलब्ध होते. त्यानुसार यंदा १४ हजार ९१५ जागा वाढल्या आहेत.कला शाखेसाठी १३ हजार ९०, वाणिज्य शाखेसाठी ३६ हजार १८५ तर विज्ञान शाखेसाठी ३७ हजार ४२० जागा उपलब्ध आहेत. विज्ञान व वाणिज्य शाखेच्या मिळून एकूण ७३ हजार ६०५ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. एमसीव्हीसी अभ्यासक्रमासाठी ७ हजार ८८५ एवढी प्रवेशक्षमता आहे. माध्यमनिहाय प्रवेशक्षमतेमध्ये इंग्रजी माध्यमाच्या ६५ हजार ७७०, मराठी माध्यमाच्या २८ हजार २० तर हिंदी (एमसीव्हीसी)च्या ७९० जागांवर प्रवेश मिळू शकतील. मागील वर्षी अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश देऊनही जागा रिक्त राहिल्या होत्या. यंदाही प्रवेश क्षमतेत वाढ झाल्याने सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील.
अकरावीच्या १५ हजार जागा वाढल्या
By admin | Published: May 03, 2017 2:59 AM