मुंबई - तीरा कामत या मुलीच्या दुर्मिळ आजारावर उपचार यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्रातील वेदिका शिंदे, ह्या पुण्यातल्या 11 महिन्यांच्या मुलीला एसएमए प्रकार- 1 असल्याचे निदान केले. हा एक दुर्मिळ जेनेटीक आजार असून 2 वर्षांच्या आधीच शिशुचे प्राण जाऊ शकतात. वेदिकाच्या बाबतीत निदान अतिशय लवकर होत असून आज तिला 16 कोटींचं इंजेक्शन देण्यात आलं आहे. इंजेक्शनचा डोस घेतल्यानंतर तिच्या आई-वडिलांना अत्यानंद झाल्याचं फोटोत दिसून येत आहे. मुलीसाठी जगभरातून झालेल्या मदतीने आणि प्रार्थनांनी आजचा दिवस उजाडला.
एका वेळेसचा जनुक बदलण्याचा उपचार असलेल्या झोलजेंस्माची किंमत 16 कोटी रूपये (2.1 दशलक्ष अमेरिकन डॉलर) आहे आणि मुलीला वाचवण्यासाठी ते आयात करणे भाग होते. वेदिकाच्या पालकांनी त्यांची समस्या फंडरेझिंग माध्यम मिलापवर सांगितली आणि जगभरातील ऑनलाईन दात्यांना मदतीची विनवणी केली. मार्च महिन्यात सुरू झालेल्या ह्या फंडरेझर अभियानाला अतिशय मोठा प्रतिसाद मिळाला. तीन महिन्यांच्या आत एकूण 14.3 कोटी रूपये इतकी धनराशी मिलापच्या अभियानाला समर्थन करणाऱ्या दात्यांच्या सौजन्यामुळे उपलब्ध होऊ शकली.
सरकारी यंत्रणांकडून कर आणि आयात शुल्क माफ करण्यामध्ये पालकांना यश आले. डॉक्टरांनी आधीच एका प्रसिद्ध अमेरिकन फार्मासुटीकल कंपनीला झोलजेंस्मासाठी विनंती केली होती. या महिन्यात असेलल्या पहिल्या वाढदिवसाआधी वेदिकाने हे इंजेक्शन घेतले. वेदिकाला लागणारे जीन रिप्लेसमेंटचे झोलजेन्स्मा’ हे औषध दोन दिवसापूर्वीच रुग्णालयात अमेरिकेतून आले होते. ते आज वेदिकाला पुणे येथील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला देण्यात आले. विशेष म्हणजे तीन महिन्यापूर्वीच हे औषध मुंबई येथील तीरा कामत या 8 महिन्याच्या मुलीला देण्यात आले असून तिच्या पालकांच्या मते तीरा औषधाला चांगला प्रतिसाद देत आहे.
क्राऊड फंडींगच्या माध्यमातून उभारला पैसा
सुरुवातीच्या टप्प्यापासून मिलापच्या ह्या फंडरेझर अभियानाला मीडियाने उचलून धरले व प्रसिद्धी दिली. पहिल्या आठवड्यामध्ये सुमारे 1 कोटी इतका निधी उभा झाला. मिलापवर ह्याच हेतुसाठी सुमारे 50 अन्य मदत करणारे अभियानसुद्धा चालवले गेले. बरखा सिंह, मास्टर शेफ शिप्रा खन्ना असे सोशल मीडियावरील प्रभावशाली व्यक्ती आणि अनुप्रिया खेर असे पालकांवर प्रभाव असलेले व्यक्ती आणि इतर अनेकांनी सहाय्य करून ह्या मोहिमेला बळकटी दिली. सोशल मीडीयावर आपल्या हँडल्स द्वारे आपल्या चाहत्यांना विनंती करून ह्यासाठी मदत करायला बॉलीवूडचा दिग्गज अभिनेता जॉन अब्राहमही समोर आला होता.