लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : दुर्धर आजार असलेल्या मुंबईतील तीरा कामत या बाळाच्या उपचारासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च येणार होता. त्यामुळे तीराच्या पालकांनी ‘क्राऊड फंडिंग’ची मोहीम चालवली. त्यास जगभरातून प्रतिसाद मिळाला. त्याच पद्धतीने आमच्याही युवान बाळासाठी मदत करा, अशी साद पुण्यातल्या रामटेककर कुटुंबीयांनी घातली आहे.
रूपाली रामटेककर यांचा एकुलता एक मुलगा युवान एका दुर्धर आजाराशी झुंज देत आहे. युवानच्या उपचारासाठी १६ कोटी रुपयांची गरज आहे. त्यासाठी नागरिकांनी आर्थिक मदत करावी, अशी विनंती रूपाली यांनी केली आहे. ‘एसएमए टाइप १’ हा आजार बरा करण्यासाठीचा खर्च सामान्य माणसांच्या आवाक्याबाहेरचा असतो. हाच स्पायनल मस्क्युलर एट्रोफी या प्रकारचा अतिदुर्मिळ आजार युवानला झाला आहे. या आजारासाठी ‘झोलजेंस्मा’ नावाचे इंजेक्शन उपलब्ध आहे. परंतु ते अमेरिकेवरून मागवावे लागते. त्या एका इंजेक्शनचा खर्च सोळा कोटी रुपये आहे. तीरा कामत नावाच्या अवघ्या सहा महिन्यांच्या मुंबईतल्या बाळाला हाच आजार होता. तिलाही या सोळा कोटींच्या औषधाची गरज होती. याचप्रमाणे युवानवरदेखील औषधोपचार झाल्यास त्याचा आजार पूर्ण बरा होण्याची खात्री डॉक्टर देत आहेत. युवान सध्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे.
“उपचाराची रक्कम खूप मोठी असल्याने आम्ही सर्वांकडून मदत घेत आहोत,” असे युवानच्या आई रूपाली रामटेककर यांनी सांगितले. नागरिकांनी मदत करण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. या वैद्यकीय मदतीवर आयकर सवलत दिली जाणार आहे. https://www.impactguru.com/fundraiser/help-baby-yuvaan