पुणे : नामांकित बँकेत काम करत असल्याचे सांगत विश्वास संपादन करून पॉलिसी काढून देण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचा प्रकार सेनापती बापट रोड परिसरात घडला आहे. याप्रकरणी एका ५० वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ओपी शर्मा, रोहित मेहता यांनी तक्रारदार महिलेला संपर्क करून एचडीएफसी बँकेचे कर्मचारी असल्याचे सांगितले. महिलेला त्यांच्या पॉलिसीबद्दल माहिती देऊन त्याची मॅच्युरिटी पूर्ण झाली असल्याचे सांगितले. मॅच्युरिटीची रक्कम २०२२ मध्येच मिळणार होती मात्र कंपनीकडून विलंब झाल्याने आम्ही ती रक्कम देणार आहोत असे सांगितले. त्यानंतर इन्शुरन्स डिपार्टमेन्टमधून बोलत असल्याचे भासवून खोटी माहिती सांगितली. पैसे जमा न झाल्याची विचारणा केली असता आरटीजीएस कोड ऍक्टिव्ह नाही, नवीन तयार करण्यासाठी अशी वेगवगेळी कारणे सांगून महिलेची एकूण १६ लाख ३८ हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण हे पुढील तपास करत आहेत.