पुणे : सायबर गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढत असून सध्या टास्क फ्रॉडचे प्रमाण वाढत असल्याचे सायबर पोलिसांनी सांगितले. नारायण पेठ परिसरात राहणाऱ्या एका तरुणाला पार्ट टाइम नोकरीचे आमिष दाखवून १६ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे.
मंदार सुभाष कार्यकर्ते (रा. नारायण पेठ, पुणे) यांनी सायबर पोलिसांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कार्यकर्ते यांना अनोळखी मोबाईल क्रमांकावरून व्हाट्सअप क्रमांकावर पार्ट टाइम नोकरीसाठीचा मेसेज आला. दिलेले टास्क पूर्ण केल्यास चांगला परतावा मिळवून देतो असे सांगून कार्यकर्ते यांना टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यास सांगितले. त्यानंतर सुरुवातीला चांगला मोबदला देऊन कार्यकर्ते यांचा विश्वास पटल्यावर त्यांना 'व्हीआयपी' आणि 'प्रीपेड टास्क' या नावाखाली पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. कार्यकर्ते यांनी सांगितल्याप्रमाणे एकूण १६ लाख ८७ हजार ६६० रुपये वेगेवेगळ्या बँकांमध्ये जमा केले. मात्र काही कालावधी उलटला तरी जमा केलेल्या पैश्यांचा मोबदला मिळत नसल्याने विचारणा केली असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनतर टेलिग्राम ग्रुपमधून देखील काढण्यात आल्याने आपली फसवणूक झाल्याचे कार्यकर्ते यांच्या लक्षात आल्यावर तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत झालेल्या प्रकारचा जबाब दिला. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल क्रमांकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे-पाटील या करत आहेत.
- गोल्डन अवरमध्ये करा तक्रार- जनजागृती मोहीम सुरु, मात्र खबरदारी घेणे नागरिकांची जबादारी
सायबर गुन्ह्यांची रोजची होणारी वाढ बघता त्याला आळा घालण्यासाठी सायबर पोलिसांकडून जनजागृती करण्यात येत आहे. परंतु नागरिकांनी सुद्धा ऑनलाईन व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. अधिक नफा मिळवण्याच्या लालसेला बळी न पडता सजग राहून ऑनलाईन व्यवहार केला पाहिजे. आणि फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यास तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधणे महत्वाचे आहे. गोल्डन अवर महत्वाचा असतो, पोलिसांना तुमचे पैसे ज्या खात्यात गेले असतील, ते गोठवणे शक्य होऊ शकते.- मीनल सुपे-पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, शिवाजीनगर