राजगुरुनगर - एक लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या खेड तालुक्यातील १५ हजार ९१५ कुटुंबांना ‘आयुष्यमान भारत’ या केंद्रच्या योजनेचा लाभ मिळणार आहे. एका कुटुंबाला ५ लाख रुपये विमा संरक्षण मिळणार असून, एकूण ९७२ आजारांवर देशभरातील नामांकित रुग्णालयात या कुटुंबातील व्यक्तींना उपचार घेता येणार आहेत. १०९७ या टोल फ्री क्रमांकावर याबाबत सविस्तर माहिती मिळू शकते. ही योजना सर्वसामान्य नागरिकांना फायद्याची ठरणार असून, या योजनेचा लाभ देण्यासाठी गावपातळीवरील ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, आशा कार्यकर्ती, आरोग्य सहायक, आरोग्यसेवक यांना जबाबदारी देण्यात आली आहे. याबाबत कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षित केले जाणार असून, त्याद्वारे गावातील कुटुंबाला मदत दिली जाणार आहे.या योजनेत समाविष्ट असणाऱ्या दवाखान्यांची संख्या वाढविण्यावर भर देणार असून, राजगुरुनगर शहरातून २९७ व चाकणमधून ७४९ कुटुंबांना याचा लाभ होणार असल्याची माहिती खेड पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे यांनी दिली.पात्र कुटुंबातील व्यक्तीचे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, कुटुंबाची माहिती संकलित करून ती आॅनलाइन पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे या कुटुंबाने दिलेल्या मोबाईल क्रमांक पुढील काळात बदलता येणार नाही. कारण लाभ देताना मोबाईलवर ओटीपी क्रमांक येणार असल्याने आता मोबाईल क्रमांक बदलण्याचे शासनाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आहे.ही एक प्रकारची पॉलिसी आहे. तिचा अधिकचा हिस्सा सरकार देणार आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी वर्षाला ११०० ते १२०० रुपये हप्ता भरावा लागणार आहे. विमा मात्र संपूर्ण कुटुंबाला मिळणार आहे. ही केंद्र सरकारची योजना असून ती तत्काळ सुरू करण्यात आली आहे. यासाठी सरकार ५० टक्के रक्कम देणार आहे.केंद्र सरकारने यासाठी ५ ते ६ हजार कोटी निधी उपलब्ध केला आहे. देशातील दीड लाख सर्व सुविधा असलेली हॉस्पिटल समाविष्ट करण्यात आली असून, कॉशलेस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.सर्वेक्षणानुसार बनविली योजनासन २०११ मध्ये झालेल्या सर्वेक्षणानुसार कुटुंबाची माहिती शासनाकडे उपलब्ध आहे. त्याअंतर्गत ही योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी कुटुंबातील नागरिकांकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. हे आधार कार्ड सरकारी योजनेच्या साईटवरून लिंक करण्यात येणार आहे. प्रत्येक कुटुंबाला आधार आयडी देण्यात येणार आहे. आधार कार्ड आणि ओळखपत्र लिंक केले जाणार आहे. याबरोबरच संबंधित व्यक्तीचे बँकेत खाते असणे महत्त्वाचे आहे.बँक खाते आधार कार्डला लिंक असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त रेशनकार्ड, मतदान कार्ड, जन्माचा दाखला, शाळेचा दाखला जमा करणे गरजेचे आहे. या योजनेद्वारे गरीब आणि गरजवंत कुटुंबातील आजारी व्यक्तीला अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या माध्यमातून आयुष्यमान भारत योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. तालुक्यात ती प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. खेड तालुक्यातून या योजनेसाठी १९१ महसुली गावांतून १५ हजार ९१५ लाभार्थी निवडण्यात आले आहेत. त्यांना या योजनेची माहिती देण्यासाठी गावपातळीवर ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, आशा कार्यकर्ती आरोग्यसहायक, आरोग्यसेवक यांच्या माध्यमातून माहिती देऊन आवश्यक कागदपत्रे जमा करून आॅनलाइन नोंदणी केली जाणार आहे.
खेड तालुका : ‘आयुष्मान भारत’चा १६ हजार कुटुंबांना होणार लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 09, 2018 2:40 AM