पुणे - कर्वेनगरमधील हिंगणे होम कॉलनीत दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी मध्यरात्री पार्क केलेल्या वाहनांवर टिकावाने घाव घालून त्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. या तोडफोडीत 12 मोटारी आणि 4 दुचाकींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही घटना मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. स्थानिक तरुणांनी हा प्रकार केल्याचे पुढे आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगणे होम कॉलनीतील मिलेनियम शाळेजवळ असलेल्या रस्त्याच्या कडेला नागरिकांनी आपली वाहने पार्क केली होती. मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका दुचाकीवरुन दोघे जण आले. त्यांनी हातातील टिकावाने रस्त्याकडेला पार्क केलेल्या वाहनांवर घाव घालण्यास सुरुवात केली. एकापाठोपाठ त्यांनी प्रामुख्याने चारचाकी वाहने लक्ष्य केली. अनेक वाहनांच्या काचा त्यांनी टिकावाने फोडल्या. या आवाजाने झोपलेल्या काही जणांना जाग आली. परंतु, घाबरुन ते त्यांच्या घरातच थांबले. एका महिला व पुरुषांनी हा प्रकार पाहिला. पण घाबरुन ते बाहेर येऊ शकले नाही.
या घटनेत पार्क केलेल्या 12 वाहनांची हल्लेखोरांनी तोडफोड केली असून 4 दुचाकी गाड्याही फोडण्यात आल्या आहेत. गाड्यांच्या काचा फोडल्यानंतर त्यांनी टिकाव, कुदळ तेथेच टाकून देऊन पळ काढला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस मार्शल यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. स्थानिक तरुणांनी हा प्रकार केल्याची माहिती पुढे आली असून त्यामागील कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.