लक्ष्मण मोरेपुणे : पुणे महापालिकेच्या अनागोंदी कारभाराचा नमुना समोर आला असून, नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाकडून कोणत्याही प्रशासकीय मान्यतेशिवाय परस्पर कामगारांची भरती करण्यात आली आहे. आवश्यक कर्मचारी संख्येपेक्षा तब्बल साठ टक्के अधिक स्वच्छता कर्मचाºयांची बेकायदा भरती केली आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक भ्रष्टाचार झाला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून, या प्रकरणाच्या चौकशीची आवश्यकता निर्माण झाली आहे. महापालिकेने क्षेत्रफळाप्रमाणे ठरवलेल्या हद्दीनुसार स्वच्छता कर्मचा-यांची भरती करण्यात आलेली आहे. झाडण कामासाठी ५० हजार चौरस फूट क्षेत्रफळासाठी एक सफाई कर्मचारी या नियमाप्रमाणे२४० कंत्राटी कर्मचा-यांची भरती करण्याची मान्यता देण्यात आलेली होती. प्रत्यक्षात मात्र ४०१ कर्मचारी काम करीत आहेत. आवश्यक संख्येपेक्षा १६० कर्मचा-यांची परस्पर भरती करण्यात आलेली आहे. यातील बरेच कर्मचारी राजकीय दबावापोटीभरती केलेले आहेत. ही भरती करताना वरिष्ठ अधिकाºयांना अंधारात ठेवण्यात आल्याचे समोर आले असून, कोणत्याही प्रकारची प्रशासकीय मान्यता घेण्यात आली नसल्यामुळे या भरतीबाबत शंका उपस्थित होऊ लागली आहे.नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या अखत्यारीतील आठ आरोग्य कोठ्यांसह येरवडा येथील कचरा हस्तांतरण केंद्रामध्ये काम करणाºया स्वच्छता सफाई कामगारांचा पगार ठेकेदारामार्फत केला जातो. या सफाई कामगारांना तीन महिन्यांचा पगार अद्याप मिळालेला नाही. जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांचा पगार रखडल्याने ऐन सणासुदीच्या काळात या कर्मचाºयांना आर्थिक चणचण भासू लागली आहे.जुलै महिन्याच्या पगारासाठी २९ लाख रुपयांची निविदा नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाने काढली आहे. त्याला प्रशासकीय मंजुरी मिळविण्यासाठी अधिका-यांची धावपळ सुरु आहे. २९ लाखांच्या निविदेमधून २४० कंत्राटी सफाई कर्मचा-यांचाच पगार होऊ शकतो. परंतु, प्रत्यक्षात ४०० सफाई कर्मचारी काम करीत असल्याने उर्वरित वाढीव १६० कामगारांचा पगार कसा केला जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
कामगारांची परस्पर भरती, मान्यतेशिवाय नेमले १६० कामगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2017 3:48 AM