घोड धरणपात्रात श्रीगोंदा (अहमदनगर) शिरूर (पुणे) हद्दीत शेकडो बोटींमधून लाखो ब्रास वाळूची चोरी करण्यात येते. नोकरशाही वाळूतस्करांना आशीर्वाद देत असल्याने रोज शेकडो ट्रक वाळू पुण्याच्या दिशेने रात्रभर वाहतूक करतात. त्यामुळे शासनाची शेकडो कोटी रुपयांचा महसूल बुडला असून महसूलचे अधिकारी दोषीवर कारवाई करणार का?याकडे तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
शिरूरच्या पश्चिम भागात संविदने, कवठे येमाई, मलठण, काढापूर, रामलिंग परिसरात मोठ्या प्रमाणात वाळूउपसा अनेक महिन्यांपासून सुरू आहे. मात्र कारवाई होत नाही.
पोलिसांनी धडक कारवाई करत धरणात मध्यभागी बोटी नेऊन त्यांना जिलेटिन कांड्या लावत बोटी पूर्णपणे निकाम्या करत बोटींना जलसमाधी दिल्याने वाळूतस्करांचे कंबरडे खऱ्या अर्थाने मोडणार आहे.
यामधे महागड्या अशा हायड्रोलिक आठ, वाळूने भरलेल्या चार तर दोन रिकाम्या व तीन लहान बोटी नष्ट करण्यात आल्यांचे सहायक पोलीस निरीक्षक सुनील मोटे यांनी सांगितले. ही कारवाई सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सुरूच होती.
यामधे १५ ते २० लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ही पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी धडक कारवाई आहे.
तहसीलदार लैला शेख म्हणाल्या, की वाळूतस्करी सुरू असलेल्या गावातील तलाठी व मंडलअधिकारी यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल एवढ्या मोठ्या प्रमाणात वाळूउपसा सुरू असताना त्यांनी कारवाई करणे गरजेचे होते.