लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्हा परिषद क्षेत्रातून महापालिकेमध्ये समावेश झालेल्या २३ ग्रामपंचायतींमधील समावेशाची प्रक्रिया सुरू असताना घाईगडबडीत नियमबाह्य झालेल्या नोकर भरती प्रकरणी जिल्हा परिषदेकडे काही तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची चौकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दत्तात्रय मुंडे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीकडे पहिल्याच दिवशी १७ तक्रारी दाखल झाल्या आहेत. समितीकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारींची गावाचे दप्तर तपासणी करण्यात येणार असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरालगतची २३ गावे पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याची गडबड सुरू आहे. या घाईगडबडीचा गैरफायदा घेऊ नये यासाठी प्रशासन सतर्क झाले आहे. ग्रामपंचायतीला त्यांच्या स्वउत्पन्नाच्या पस्तीस टक्के खर्चाच्या मर्यादेत नोकरभरती करण्यास परवानगी आहे. त्याचा वापर करून काही ग्रामपंचायतींनी नोकरभरती केली असल्याच्या तक्रारी आहेत. प्रामुख्याने बावधन, सूस, खडकवासला या ग्रामपंचायतींबरोबर दोनतीन ठिकाणच्या तक्रारी असून, त्याची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले होते. यासाठी मुंडे यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समिती स्थापन केली असून, यात खेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे, लेखा व वित्त अधिकारी रणजित कदम, कक्ष अधिकारी धनंजय खटावकर आणि भोर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी नीलेश जाधव यांचा समावेश आहे. ही समिती आता या सर्व बोगस नोकर भरती प्रक्रियेची चौकशी करणार आहे.