पुणे : रस्त्यावर सिग्नलला बसविलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे पुणेकरांची अक्षरश: लूट होत आहे. कॅमेऱ्यात फोटो आल्यामुळे यंदाच्या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांतच तीन लाख ५९ हजार १८२ पुणेकरांवर विना हेल्मेटची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १७ कोटी ९४ लाख ३९ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. या छुप्या हेल्मेट सक्तीमुळे गाडीवर बसत असलेल्या दंडामुळे अनेकांना गाडी विकण्याची वेळ आली आहे.
मुंबई वाहतूक शाखेच्या वतीने बुधवारीच एक परिपत्रक काढले आहे. यापुढे दुचाकीस्वाराबरोबरच मागे बसलेल्या सहप्रवाशानेही हेल्मेट वापरणे सक्तीचे केले आहे. पुणेकरांचा हेल्मेटसक्तीला विरोध असतानाच शहरात छुप्या पद्धतीने हेल्मेटसक्ती लागू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी विनाहेल्मेटची ८६ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली आहे.
जानेवारीपासून ३० एप्रिल २०२२ पर्यंत वाहतूक शाखेकडून विना हेल्मेट ३ लाख ५९ हजार १८२ दुचाकीधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर १७ कोटी ९४ लाख ३९ हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. राज्यातील कोणत्याही शहरात इतक्या मोठ्या प्रमाणावर विनाहेल्मेटची कारवाई केली जात नाही.
सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा उपयोग वाहतूक कारवाईपुरताच
गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी चौकाचौकांत बसविण्यात आलेल्या सीसीटीव्हीचा सर्वाधिक वापर हा विनाहेल्मेट कारवाई करण्यासाठी होत आहे. पुण्यासह संपूर्ण राज्यात या विषयावर जनतेत आक्रोश आहे. लोकांचा हा रोष काही लोकप्रतिनिधींनी गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांच्या कानावर घातला. त्यावर राज्यात हेल्मेट सक्ती व इतर कारणांकरिता वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या दंड वसुलीबाबत पोलीस आयुक्त व जिल्हा पोलीस अधीक्षकांची बैठक घेण्यात येईल, असे देसाई यांनी लोकप्रतिनिधींना आश्वासन दिले.
१२०० सीसीटीव्हींचे तुमच्यावर आहे लक्ष
शहरातील जवळपास १२०० सीसीटीव्हींचा प्रामुख्याने वापर विना हेल्मेट आणि झेब्रा क्रॉसिंगवर वाहन उभे राहिल्यास करण्यात येणाऱ्या कारवाईसाठी होत असल्याचे दिसून येते. दररोज वाहतूक शाखेकडून जवळपास साडेचार ते पाच हजार वाहनचालकांवर सीसीटीव्हीद्वारे कारवाई करण्यात येते. त्यात केवळ विनाहेल्मेटच्या सरासरी तीन हजार दुचाकी वाहनधारकांवर कारवाई करण्यात येत आहे.
विना हेल्मेटची गेल्या चार महिन्यांतील कारवाई
एकूण केसेस - ३५९१८२
दंड - १७९४३९०००
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२१ मधील विनाहेल्मेट कारवाई
एकूण केसेस - १७३९९६४
एकूण दंड - ८६९९८२०००