घोडेगाव (पुणे) : घोडेगाव पोलिस ठाण्यात शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून दुप्पट करण्याच्या बहाण्याने १७ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोन व्यक्तींविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी उल्हास पिंगळे (रा. नारोडी, ता. आंबेगाव), अविनाश कदम (रा. फेरबंदर, मुंबई) या दोन व्यक्तींविरुद्ध फसवणूक केल्याची तक्रार भगवान मारुती फलके (वय ६१, रा. आमोंडी, ता. आंबेगाव) यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात दिली आहे.
३१ ऑगस्ट २०२१ रोजी उल्हास पिंगळे यांनी भगवान फलके यांना फोन करून सांगितले की, माझा मित्र अविनाश कदम हा शेअर मार्केटमध्ये पैसे दुप्पट करून देत आहे. तुम्हाला गुंतवणुकीची संधी आहे. पैसे दुप्पट करून देण्याची जबाबदारी माझी आहे, असे सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून फलके यांनी पुणे जिल्हा सहकारी बॅंक शाखा घोडेगावमधून आरटीजीएसद्वारे तीन लाख रुपये कदम यांच्या खात्यावर पाठवून दिले. त्यानंतर १ सप्टेंबर २०२१ रोजी पिंगळे व कदम यांनी १०० रुपयांच्या मुद्रांक शुल्कावर घोडेगाव येथे येऊन उसनवार पावती करून दिली. अन् परत अविनाश कदम मुंबई येथे गेल्यावर उसनवार पावती व तीन लाख रुपयांचा धनादेश मला दिला. त्यामुळे त्याच्यावर माझा विश्वास बसला.
त्यामुळे मी, माझी पत्नी, मुलगा, साडू, जावई व मित्र या सर्वांनी मिळून अविनाश कदम यांच्याकडे १७ लाख रुपये गुंतवले. ३० सप्टेंबर २०२१ पासून जुलै २०२२ पर्यंत दरमहा पैसे बॅंक खात्यावर जमा होत होते. त्यानंतर पैसे बॅंक खात्यावर येणे बंद झाले. याबाबत उल्हास पिंगळे व अविनाश कदम यांना वारंवार विचारणा केली असता ते टाळाटाळ करून लागले. फोन उचलणे बंद केले. त्यामुळे आमची १७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने भगवान फलके यांनी घोडेगाव पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तपास सहायक पोलिस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक महेश पवार करत आहे.