पुणे : शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला नफा मिळेल, असे आमिष दाखवून फसवणूक केल्याच्या दोन घटना समोर आल्या आहेत. सायबर चोरट्यांनी दोन महिलांची तब्बल १७ लाखांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी रविवारी (दि. २३) येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका ४६ वर्षीय महिलेने येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चीनशी अजुडीया आणि फरजाना शेख यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च २०२२ ते जून २०२४ यादरम्यान घडला आहे. आरोपींनी फिर्यादी महिलेचा विश्वास संपादन करून स्टाॅक ट्रेडिंगमध्ये अल्पावधीत नफा मिळवता येऊ शकताे असे आमिष दाखवले. महिलेकडून ८ लाख ८५ हजार रुपये घेऊन कोणताही परतावा न देता फसवणूक केली. या प्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेळके हे पुढील तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत, शास्त्रीनगर येथे राहणाऱ्या ३६ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. अज्ञात आरोपींनी व्हॅाट्सॲपवर एका ग्रुपमध्ये ॲड करून शेअर ट्रेडिंगची माहिती दिली. नफा मिळवून देण्याचे प्रलाेभन दाखवले. त्यांचा विश्वास संपादन करून बँक खात्यातील एकूण ८ लाख ४२ हजार रुपये घेऊन काेणताही परतावा न देता फसवणूक करण्यात आली आहे. याबाबत पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक शेळके करत आहेत.