लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लोणावळा - कर्जत दरम्यान जवळपास १७ ठिकाणी पडलेल्या दरडी हटविण्यात आल्या आहेत. यात रुळांचे मोठे नुकसान झाले असले तरीही रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर काम करून मेन लाईन, डाऊन लाईन वाहतुकीसाठी खुली केली. यासाठी ९५० कामगारांनी २२ तास अखंड काम केले. गुरुवारी मध्यरात्री २ वाजता पुणे स्थानकावरून मुंबईच्या दिशेने प्रवासी गाड्याची वाहतूक सुरू झाली.
बुधवारी रात्री एकच्या सुमारास लोणावळा - कर्जत सेक्शन दरम्यान मोठया प्रमाणात दरडी पडून रुळांवर माती येणे, काही ठिकाणी रुळांना तडे जाणे, तर काही ठिकाणी ‘ओएचइ’चे पोलचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे किमान दोन ते तीन दिवस पुणे - मुंबई रेल्वे सेवा पूर्णपणे विस्कळीत होईल अशी भीती होती. मात्र रेल्वे प्रशासनाने अवघ्या २२ तासांत हे काम पूर्ण करून दोन मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजता दोन्ही मार्गिका फिट असल्याचे सांगण्यात आले. आता केवळ अपलाईन ब्लॉक आहे. ती देखील लवकारत लवकर खुली होण्याची शक्यता आहे.
------------------------------
धो धो पाऊस, अन् मशीनची धडधड
कर्जत १५७ मिमी तर लोणावळ्यात १७८ मिमी पावसाची नोंद झाली. यावरून पाऊस किती मोठया प्रमाणात पडत होता. याचा अंदाज येतो. रेल्वेने घाटात पोकलेन व जेसीबी आणणे हे एक दिव्य होते. मात्र त्यासाठी बोल्डर ट्रेन, ब्लास्ट रेकचा वापर करण्यात आला. यावरून पोकलेन आणण्यात आले. धो धो पावसात ही मशीनच्या साह्याने कामगारानी रुळ पूर्ववत करण्यासाठी मेहनत घेतली. यावेळी ७५ सुपरवायझर, ३८ अधिकारी उपस्थित होते. या कामी २ बोल्डर स्पेशल, ४ बलास्ट रेक, २ पोकलेन, ४ जेसीबीची मदत घेण्यात आली.
---------------------------
मध्य रेल्वे प्रशासनाने दोन स्थानकांच्यामध्ये गाड्या अडकून पडू नये, यासाठी विशेष काळजी घेतली होती. कसारा, इगतपुरी, बदलापूर, खडावली इत्यादी स्थानकांवर गाड्यांचे नियमन केले. अनेक गाड्या रद्द केल्या, काही गाड्यांचे मार्ग वळविण्यात आले, तर काही गाड्यांचे शॉर्ट टर्मिनेशन करण्यात येऊन तेथूनच परत पाठविण्यात आल्या.
- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, मुंबई