पुणे : पुण्यातील वैभवशाली विसर्जन मिरवणूकीसाठी होणारी गर्दी विचारात घेता येत्या मंगळवारी (दि.१७) वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आले आहे. या दिवशी विसर्जन मार्ग, मध्यभागातील प्रमुख रस्त्यांसह इतर १७ रस्ते वाहतूकीसाठी बंद असणार आहेत. या रस्त्यावर ठिकठिकाणी डायव्हर्शन पॉईंट काढले असून वाहनधारकांना पर्यायी मार्ग देखील उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मिरवणूक संपेपपर्यंत हा वाहतूक बदल असणार आहे असे वाहतूक पोलिस उपायुक्त अमोल झेडे यांनी माहिती दिली.
मंगळवारी (दि.१७) सकाळीच मिरवणूकीला सुरवात होते. त्यामुळे विसर्जन मिरवणूकीवेळी शहरातील शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, कुमठेकर रोड, गणेश रोड, केळकर रोड, टिळक रोड, शास्त्री रोड, जंगली महाराज रोड, कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, भांडारकर रस्ता, पुणे सातारा रस्ता, सोलापूर रस्ता, प्रभात रोड, बगाडे रोड, गुरू नानक रोड या रस्त्यावरील काही टप्प्यांमधील वाहतूक विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत जंगली महाराज रस्त्यावरील झाशीची राणी चौक, शिवाजी रस्त्यावरील काकासाहेब गाडगीळ पुतळा, मुदलीयार रस्त्यावरील दारूवाला पुल, लक्ष्मी रस्त्यावरील संत कबीर पोलीस चौकी, सोलापूर रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौक, सातारा रस्त्यावरील व्होल्गा चौक, बाजीराव रस्त्यावरील वीर सावरकर पुतळा चौक, लाल बहाद्दूर शास्त्री रोडवरील सेनादत्त पोलीस चौकी, कर्वे रोडवरील नळस्टॉप, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील गुडलक चौकातून डायव्हर्शन पाँईट काढण्यात आले आहेत. तर, लक्ष्मी रोड, केळकर, कुमठेकर रोड, बाजीराव रोड, टिळक रोड, शिवाजी रोड, शास्त्री रोड, जंगली महाराज रस्ता, कर्वे रोड, फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर ठिकठिकाणी नो पार्विंâग करण्यात आले आहे. खंडोजीबाबा चौक ते हॉटेल वैशाली यांना जोडणार्या उपरस्त्यांच्या १०० मीटर परिसरात पार्किंग बंदी घालण्यात आली आहे.
४८ तास संपूर्ण शहरात अवजड वाहनांना बंदी
गणेश विसर्जन मिरवणूकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी रात्री १२ ते बुधवारी (दि.१८) रात्री बारापर्यंत एकूण ४८ तास संपूर्ण शहरामध्ये सर्व प्रकारच्या जड वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.
वाहनधारकांसाठी पर्यायी रिंगरोड
विसर्जन मिरवणूकवेळी बंद रस्त्याकरीता पर्यायी मार्ग रिंग रोड तयार करण्यात आला आहे. कर्वे रोड-नळस्टॉप चौक- लॉ कॉलेज रोड- सेनापती बापट रोड जंक्शन -गणेशखिंड रोड सिमला ऑफिस चौक -संचेती हॉस्पीटल चौक -इंजि. कॉलेज चौक -आंबेडकर रोडवरील शाहिर अमर शेख चौक- मालधक्का चौक- बोल्हाई चौक -नरपतगिरी चौक -नेहरु रोडवरुन संतकबीर पोलीस चौकी -सेव्हन लव्हज चौक -वखार महामंडळ चौक-शिवनेरी रोडवरुन गुलटेकडी मार्केटयार्ड -मार्केटयार्ड जंक्शन सातारा रोडने व्होल्गा चौक (लक्ष्मीनारायण सिनेमा) -सिंहगड रोडने मित्रमंडळ चौक- सावरकर चौक सिंहगड रोड जंक्शन -लाल बहादुर शास्त्री रोडने सेनादत्त पोलीस चौकी,- अनंत कान्हेरे पथावरुन म्हात्रे पुल ते नळस्टॉप या मार्गाचा वापर करावा.