पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) तत्कालीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांचा आणखी एक निर्णय फिरविण्यात आल्याचे समोर आले आहे. केवळ माननीयांच्या आग्रहास्तव सुरू असलेले आणि तोट्यात जाणारे २७ मार्ग बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. त्यापैकी १७ मार्ग पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. तर उर्वरीत दहा मार्ग बंदच ठेवण्यात आले आहेत.पीएमपीचा खर्च कमी करण्यासाठी मुंढे यांनी विविध उपाययोजना केल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी तोट्यात जाणारे २७ मार्ग बंद केले होते. त्यामुळे या मार्गावरील सुमारे ३८ बस अन्य मार्गावर वळविण्यात आल्या. तसेच काही पास केंद्र बंद करणे, पासचा दरात बदल, पंचिंग पास बंद करणे, बेशिस्त कर्मचाऱ्यांचे निलंबन, ठेकेदारांवर जबर दंडात्मक कारवाई असे विविध निर्णय मुंढे यांनी घेतले. मात्र, त्यांची बदली झाल्यानंतर त्यांनी रद्दपातल ठरविलेले एक-एक निर्णय पुन्हा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न चालविण्यात आले आहे. त्यामध्ये तोट्यातील मार्ग बंद करण्याच्या निर्णयाचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे. मुंढे यांच्या या निर्णयाला त्यावेळी प्रवासी संघटना, स्थानिक लोकप्रतिनिधींनी विरोध केला. पण त्याला न जुमानता मार्ग बंद ठेवण्याच्या निर्णयावर ते कायम राहिले.पीएमपीच्या वाहतुक विभागाने बंद केलेल्या २७ मार्गांपैकी पुन्हा १७ मार्ग सुरू केले आहेत. उर्वरीत १० मार्ग बंदच ठेवण्यात आले आहेत. बंद करण्यात आलेल्या बसेसला संबंधित मार्गावर प्रति किलोमीटर केवळ १२ ते ४२ रुपये उत्पन्न मिळत होते. उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत असल्याने हे मार्ग बंद करण्यात आले होते. यापैकी काही उत्पन्न वाढू शकणारे १७ मार्ग पुन्हा सुरू करण्यात आले आहे. पीएमपीच्या ताफ्यात सुमारे २०० नवीन मिडी बस दाखल झाल्या आहेत. त्यामुळे हे मार्ग सुरू करणे शक्य झाले आहे.----------सुरू करण्यात आलेले मार्ग स्वारगेट- निगडी, स्वारगेट- धायरी, स्वारगेट- महंमदवाडी, भेकराईनगर- स्वारगेट, पुणे स्थानक- हडपसर, पुणे स्थानक- महंमदवाडी, डेक्कन जिमखाना- विद्यानगर, महापालिका भवन- मुंढवा, महापालिका भवन - ईशाननगरी, कोथरुड डेपो- हडपसर, कोथरुड डेपो- महात्मा फुले मंडई, महात्मा फुले मंडई- पटवर्धन बाग, गुजरात कॉलनी- पिंपळे गुरव, पिंपरी- देहूगाव, विश्रांतवाडी- आझादनगर, विश्रांतवाडी- आळंदी, वाकड पूल- हिंजवडी फेज-३.
मुंढे यांनी बंद केलेले १७ मार्ग पुन्हा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2018 1:47 PM
तुकाराम मुंढे यांची बदली झाल्यानंतर त्यांनी रद्दपातल ठरविलेले एक-एक निर्णय पुन्हा अंमलात आणण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविण्यात आले आहे...
ठळक मुद्देपीएमपीच्या वाहतुक विभागाने बंद केलेल्या २७ मार्गांपैकी पुन्हा १७ मार्ग सुरूपीएमपीच्या ताफ्यात सुमारे २०० नवीन मिडी बस दाखल, त्यामुळे हे मार्ग सुरू करणे शक्य