लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : कोहिनूर कंपनीचे बनावट नाव व लोगो लावून आटा चक्की विक्री केल्याप्रकरणी
पुणे व अहमदनगर जिल्ह्यात प्रसिद्ध असलेल्या वारुळवाडी (नारायणगाव) येथील गडाख मशिनरीज या दुकानावर छापा टाकून नारायणगाव पोलिसांनी १४ लाख ९७ किमतीच्या १७५ बनावट आटा चक्क्या जप्त करून कॉपीराईट अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.
गडाख मशिनरीजचे मालक सुधीर प्रकाश गडाख (वय ३७, रा. संगमनेर, जि. अहमदनगर) यांच्यावर कॉपीराईट अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची फिर्याद विनोद सेल्स कार्पोरेशन अॅग्रीकल्चर मशिनरीज व डोमेस्टिक कोहिनूर लोअर मिलचे मालक पराग अशोककुमार शहा (रा. नारायणगाव, ता. जुन्नर) यांनी दिली.
वारूळवाडी येथे गडाख मशनरीज दुकानात सुधीर गडाख हे कोहिनूर ब्रँडचे बॉक्स व आटा चक्कीवर बनावट नाव व लोगो लावून विक्री करीत असल्याची माहिती पराग शहा यांना मिळाली. शहा यांनी पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, उपविभागीय अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, शैलेश वाघमारे, पोपट मोहरे, शामसुंदर जायभाय, आकाश खंडे, पोलीस पाटील सुशांत भुजबळ या पोलीस पथकाने गडाख मशनरीज दुकानात छापा टाकला असता त्या ठिकाणी ३ लाख ४ हजार किमतीच्या कोहिनूर असे बनावट नाव लावलेल्या २ एचपीच्या वेगवेगळ्या रंगाच्या ३२ आटा चक्क्या, ११ लाख २२ हजार किमतीच्या १ एचपीच्या वेगवेगळ्या रंगाच्या १३२ आटा चक्क्या व ७१ हजार ५०० किमतीच्या ११ आटा चक्क्या अशा एकूण १७५ आटा चक्क्या बनावट आढळून आल्या. पोलिसांनी त्या सील करून जप्त केल्या आहेत.
यासंदर्भात पोलीस अधिकारी ताटे म्हणाले, कोहिनूर आटा चक्कीचे उत्पादन व विक्रीचे कायदेशीर रजिस्टर व कॉपीराइटचे अधिकार विनोद सेल्स कार्पोरेशन एग्रीकल्चर मशिनरीज व डोमेस्टिक कोहिनूर लोअर मिलचे मालक पराग अशोककुमार शहा यांना आहे. असे असताना अधिकाराचे उल्लंघन करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी स्वतःचे गडाख मशिनरीजचे मालक सुधीर प्रकाश गडाख यांनी कॉपीराईट कायद्याचे उल्लंघन करीत विनापरवाना कोहिनूर कंपनीचे बनावट नाव लावून कोहिनूर आटा चक्की दुकानांमध्ये ठेवून ते विक्री करत होते. यामुळे शहा यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.
फोटो : वारूळवाडी (नारायणगाव) येथील गडाख मशिनरीज या दुकानावर छापा टाकून नारायणगाव पोलिसांनी कोहिनूर कंपनीचे बनावट आटा चक्क्या जप्त केल्या.