लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यासह संपूर्ण जिल्ह्यात निर्माण झालेल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना करत कडक निर्बंध लागू केले. याचाच एक भाग म्हणून सर्व खाजगी व सरकारी हाॅस्पिटल्सचे ऑक्सिजन ऑडिट सुरू केले. यात पहिल्या टप्प्यात पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागातील मिळून दहा सरकारी हाॅस्पिटलमध्ये झालेल्या ऑक्सिजन ऑडिटमुळे दिवसाला तब्बल १७.६२ टन ऑक्सिजनची बचत झाली. यात प्रामुख्याने शहरी भागात आणि तिन्ही जम्बो कोविड हाॅस्पिटलमध्ये सर्वाधिक गैरवापर होत असल्याचे समोर आले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण संख्या ज्या प्रमाणात वाढत गेली, तशी ऑक्सिजनच्या मागणीत प्रचंड मोठी वाढ झाली. पुणे जिल्ह्यात पहिल्या लाटेत दिवसाला सरासरी केवळ १५० ते २०० मे.टन ऑक्सिजन मागणी होती यामध्ये आता दिवसाला तब्बल दीडशे मे. टनची वाढ झाली आहे. आज दिवसाला सरासरी ३५० मे.टन ऑक्सिजन लागतो. पुण्यासह संपूर्ण राज्यातच ऑक्सिजनची मागणी वाढल्याने तुटवडा निर्माण होऊ लागला. यामुळे शासनाने शंभर टक्के ऑक्सिजन आरोग्यासाठीच राखीव ठेवला. त्यानंतर देखील ऑक्सिजनचा तुटवडा कमी झाला नाही. यामुळे पुण्यासाठी दुसऱ्या राज्यांतून ऑक्सिजन आणावा लागत आहे. हे सर्व सुरू असतानाच मिळणाऱ्या ऑक्सिजनचा अंत्यत काटकसर करून वापर करण्यावर अधिक भर दिला. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात सर्व खाजगी व सरकारी हाॅस्पिटलचे ऑक्सिजन ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला.
ऑक्सिजन ऑडिटमध्ये गरजेपेक्षा अधिक प्रमाणात ऑक्सिजन पुरवठा दिला जातो, रुग्ण बाथरूमला गेल्यानंतर ऑक्सिजन चालुच असतो, रुग्ण जेवण करत असताना ऑक्सिजन चालुच ठेवला जातो, अनेक वेळा रात्री रुग्ण ऑक्सिजनचे मशिन बाजुला काढून झोपी जातात आणि ऑक्सिजनची फारशी गरज नसलेल्या रुग्णांना देखील ऑक्सिजन पुरवठा सुरूच ठेवणे आदी मुद्दे तपासणी केली जाते.
--
जिल्ह्यातील या सरकारी हाॅस्पिटलमध्ये झाले ऑक्सिजन ऑडिट
हाॅस्पिटल दररोजचा वापर (टन) ऑडिटनंतर घट (टन)
अण्णासाहेब मगर १३.९० ४.४८ (२५%)
वायसीएम १२.८७ १.९० (१३%)
ऑटोक्लस्टर ४.६७ ०.५३ १०%)
सीओईपी १६.६९ ६.४२ (२७%)
जम्बो बाणेर ०९.५ १.५ (१४%)
नायडू ०६.५ १.० (१४%)
दळवी ०३.५ ०.५ (१४%)
औंध ०.७ ०.५
मंचर उपजिल्हा १.२ ०.३
बारामती उपजिल्हा २.० ०.४