पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. सद्यस्थितीत शहरात १८ सक्रिय रुग्ण असून त्यांच्यामध्ये सौम्य लक्षणे आहेत. मात्र, ज्या नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासह आदी आजार आहेत, त्यांनी स्वत:हून गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावा, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी केले आहे.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. पिंपरी-चिंचवड शहरात सर्वाधिक १८ रुग्ण आढळले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यास महापालिकेच्या रुग्णालयातील बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटरसह सर्व तयारी आहे. मात्र, सध्या आढळणाऱ्या कोरोना रुग्णामध्ये सौम्य लक्षणे आढळत आहे. त्यामुळे काळजी करण्याचे काही कारण नाही. कोरोना संशयित रुग्णांचे नमुने घेऊन चाचणीही करण्यात येत आहे. ज्या नागरिकांना मधुमेह, उच्च रक्तदाब यासह आदी आजार आहेत, त्यांनी स्वत:हून गर्दीच्या ठिकाणी जाताना मास्क वापरावे. तसेच सॅनिटायजरचा वापर करावा.
सध्या वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने सर्दी, खोकल्याचे रुग्ण वाढत आहेत. आवश्यकतेनुसार सर्दी, खोकल्याच्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. वाढता कोरोना आणि जेएन-१ या नवीन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या आरोग्य विभागाच्या वतीने व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरात सद्यःस्थितीत १८ रुग्ण सक्रिय आहेत. यापैकी १४ रुग्ण घरीच उपचार घेत असून, ४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, या सर्व रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र, काळजी घ्यावी. - डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी.