चाकण : चाकण सोमवारी ( ३० जुलै मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान वाहनांची जाळपोळ व तोडफोफ करण्यात आली होती. तसेच पोलिसांवर दगडफेकही झाली होती. या जाळपोळ व हिंसाचार प्रकरणी एकूण १८ जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी ३ जण अल्पवयीन आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी १५ जणांना गुरुवारी संध्याकाळी शिवाजीनगर सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. मुख्य न्याय दंडाधिकारी सत्यशीला कटारे यांनी १५ आरोपींना ८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी मनोज दौलत गिरी (वय-२३), सूर्यकांत बाळू भोसले (२१), परमेश्वर राजेभाऊ शिंदे(२२), अभिषेक विनोद शाह(१९), विशाल रमेश राक्षे(२६), सत्यम दत्तात्रय कड (१९), समीर विलास कड(२०), रोहिदास काळूराम धनवटे (१९), विकास अंकुश नाईकवाडी (२८), सोहेल रफिक इनामदार (१९), प्रवीण उद्धव गावडे(२३), आकाश मारुती कड(२५), सचिन दिगंबर आमटे (२७), आनंद दिनेश मांदळे (१८), प्रसाद राजाराम खंडेभराड (१८) अशी पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
..................
धरपकडीच्या वातावरणामुळे तरुणांमध्ये भीतीचे सावट चाकण व आजूबाजूच्या परिसरातील तरुणांमध्ये धरपकड आणि गुन्हे दाखल होण्याच्या भीतीचे सावट आहे. महाविद्यालयातील तरुण गायब झाले असून त्यांनी कॉलेजकडे पाठ फिरवली आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार ते पाच हजार लोकांवर गुन्हे दाखल करण्याची माहिती दिली असून त्यात आपला समावेश होईल की काय अशी अनामिक भीती तरुणांमध्ये आहे.एकूणच त्यामुळे वाहतुकीला कोठेही अडथळा नाही. रस्त्यावर तुलनेने दुचाकी वाहनांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसते. चाकण व राजगुरूनगर परिसरातील जनजीवन पूर्ववत सुरु झाले असले तरी तणावाखाली आहे. आता पोलिसांची काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनाम्यानंतर जळीत बसेसचे भाग ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. बस स्थानकावर एसटी बस धावू लागल्यानेप्रवाशांची वर्दळ दिसत आहे.