लोकमत न्यूज नेटवर्कदेहूगाव : श्री संत तुकाराममहाराज पालखी सोहळ्यासाठी पालखी रथ ओढण्याची सेवा मिळावी यासाठी जिल्ह्यातील १७ व सातारा जिल्ह्यातील एक बैल जोडी मालकांनी श्री संत तुकाराममहाराज संस्थानकडे अर्ज केले असल्याची माहिती पालखी सोहळा प्रमुख सुनील दिगंबर मोरे यांनी दिली. या वेळी संस्थानचे अध्यक्ष पंढरीनाथ मोरे, पालखी सोहळा प्रमुख अभिजित मोरे, जालिंदर मोरे, सुनील दामोदर मोरे आदी उपस्थित होते. या वर्षी पालखी रथाला बैल जुंपण्याचा मान आपल्या बैल जोडीला मिळावा यासाठी हभप दत्तात्रय बधाले (नवलाख उंब्रे), सूरज खांदवे मुकादम (लोहगाव), भानुदास खांदवे (लोहगाव), विशाल भोंडवे (रावेत), नानाजी शेळके (पिंपोळी), गणेश भुजबळ (चिखली), ज्ञानेश्वर शेडगे (वाकड), उषा पवार (लोहगाव), सुभाष मोरे (चिखली), बाळासाहेब मोरे (टाळगाव), अप्पासाहेब लोखंडे (चिंबळी), प्रदीप वाल्हेकर व आनंदा वाल्हेकर (वाल्हेकर वाडी), गोपाळराव कुटे (आकुर्डी), बाळासाहेब कड (कुरुळी), सुनील जमदाडे (सातारा), हगवणे परिवार (देहूगाव), राजाराम राक्षे (साळुंब्रे), प्रणव शेळके (माण) यांनी अर्ज सादर केले. या बैल जोडींची पाहणी विश्वस्थ मंडळ प्रत्यक्ष जागेवर जाऊन करीत असून, या बैलांचे वय, छाती, शिंगे, वशिंड, रंग, शेपटी, खूर, त्यांची चाल व काम करण्याची क्षमता यांची पाहणी करून त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्रही घेण्यात येत आहे. या निकषांनुसार पारदर्शीपणे सर्व बैल जोडींचे परीक्षण करण्यात येत असून, पालखी रथाला शोभेल अशा दोन बैल जोडींची निवड करण्यात येणार आहे. अंतिम बैलजोडीची घोषणा केली जाईल.
१८ बैलजोडी मालकांचे अर्ज दाखल
By admin | Published: May 29, 2017 2:58 AM