लोकमत न्यूज नेटवर्क
.............................
पुणे: कौटुंबिक न्यायालयात सुरू असलेले १८ जोडप्यांमधील वाद लोक अदालतीच्या माध्यमातून तडजोडीद्वारे आज मिटविण्यात आले. त्यामुळे या जोडप्यांचा संसार पुन्हा सुरू झाला आहे.
घटस्फोट आणि नांदायला यावे याबाबतचे दावे सोडवण्यासाठी येथील कौटुंबिक न्यायालयात लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १०४ प्रकरणे तडजोडीसाठी ठेवण्यात आले होते. त्यातील २० प्रकरणे तडजोडीने मिटली. त्यातील १८ प्रकरणे ही घटस्फोट आणि पत्नीने नांदायला यावे किंवा पतीने पत्नीला नांदविण्यासाठी घेऊन जाण्याचे होते. तर दोन प्रकरणे हे पोटगी मिळण्यासाठी होते. या दोन्ही प्रकरणात पोटगी देण्याबाबत पती-पत्नीत तडजोड झाली व त्यांचा वाद मिटला. उर्वरित १८ प्रकरणांतील जोडप्यांनी घटस्फोट घेण्याऐवजी पुन्हा एकत्र येण्याचा तसेच नांदायला जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांचा सुर पुन्हा जुळला असून त्यांच्यातील न्यायालयीन लढाई आता संपली आहे. कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे, न्यायाधीश जी. जी. भालचंद्र, न्यायाधीश एन. आर. नाईकवडे, न्यायाधीश आर. एस. आराध्ये, निवृत्त न्यायाधीश ए. ए. शहापुरे, दीपक जोशी, रवींद्र कुलकर्णी हे पॅनेल न्यायाधीश होते. तर दि फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा ॲड. वैशाली चांदणे, ॲड. गुलाब गुंजाळ, ॲड. झाकीर मनियार, ॲड. गीता निकाळजे यांनी पॅनेल वकील म्हणून कामकाज पाहिले.
दरम्यान, तडजोडीतून सत्वर वाद मिटल्याने समाधान झाल्याचा दावा या जोडप्यांनी केला. काही प्रकरणे ऑनलाइन देखील निकाली काढण्यात आली. बाहेर गावी असलेल्या पक्षकारांचा वेळ आणि पैसा वाचला. या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन सुविधा अधिक व्यापक व्हावी, अशी मागणी पक्षकार करीत होते.