पिंपरी : दलाल म्हणून पाच मध्यस्थांनी मिळून एका कंपनीची ३०५ एकर जमीन विकली. जमिनीचा व्यवहार झाल्यानंतर चार एजंट, एक कंपनी प्रतिनिधी आणि एक जमीन खरेदीदार यांनी मिळून १८ कोटी २५ लाख रुपये कमिशन विभागून न देता एका मध्यस्थाची फसवणूक केली. चिंचवड येथे ९ जानेवारी २०११ ते ५ मे २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला.
गुरुप्रसाद बिलोचनराम जैस्वाल (६३, रा. टिटवाळा पश्चिम, ता. कल्याण, जि. ठाणे) यांनी याप्रकरणी रविवारी (दि. ६) चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार प्रवीण रमेश साळवे, रमेश साळवे, प्रेमचंद बाफना, सादिक पाशा, के. विश्वनाथ आणि अरविंद जैन यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील जांभूळ येथे बीपीएल कंपनीची ३०५ एकर जमीन आहे. या व्यवहारात कंपनीचे प्रतिनिधी के. विश्वनाथ आणि जमीन खरेदी करणारे अरविंद जैन यांनी फिर्यादी गुरुप्रसाद यांना जमीन व्यवहार झाल्याची माहिती दिली नाही. तसेच गुरुप्रसाद यांच्या चार एजंट सहकाऱ्यांना कमिशन दिल्याची माहिती फसवणूक करण्याच्या उद्देशाने न देता फिर्यादी गुरुप्रसाद यांचा विश्वासघात केला.
गुरुप्रसाद यांच्या हिश्श्याचे कमिशन १८ कोटी २५ लाख रुपये त्यांना विभागून न देता त्यांची फसवणूक केली. गुरुप्रसाद यांनी मागील दहा वर्षांपासून त्यांचे कमिशन मागण्याचा प्रयत्न केला असता त्यांना संशयितांनी जीवे मारण्याची धमकी दिली.