पुणे : तुम्हाला सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाइड मेंबरशिप देतो. त्यातून तुम्हाला अनेक महिलांबरोबर सहवास मिळेल. त्यांच्याकडून तुम्हाला पैसेही मिळतील, असे आमिष दाखवीत सायबर चोरट्यांनी एका तरुणाला जाळ्यात ओढत त्याला १८ लाख ३७ हजार ६०० रुपयांना गंडा घातला. तरुणाला वडिलांचे पेन्शनचे आलेले पैसे गमवावे लागले. याप्रकरणी सनसिटी रोडवर राहणाऱ्या एका ४४ वर्षांच्या तरुणाने सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. हा प्रकार २९ मार्च ते ५ एप्रिल २०२२ दरम्यान घडला.
फिर्यादी हा सनसिटी रोडवरील एका चांगल्या सोसायटीत राहतो. तो मुंबईतील एका हेल्थ इन्शुरन्स कंपनीत ६ महिन्यांपासून कामाला लागला आहे. त्याचे वडील नुकतेच निवृत्त झाले. २९ मार्चला सायंकाळी त्याला रिना नावाच्या महिलेचा फोन आला. तिने त्याला हनी डेट या कंपनीत तुम्हाला सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाइड मेंबरशिप देतो, असे सांगितले. त्यांच्या मोबाइल क्रमांकावर काही तरुणींची छायाचित्रे पाठविली. तरुण त्या आमिषाला बळी पडला. त्यानंतर चोरट्यांनी वेगवेगळ्या मोबाइलवरून त्यांना फोन केले. वेगवेगळी कारणे सांगून, प्रोफाइल अपडेट करण्याच्या बहाण्याने तरुणाला वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरायला लावले. त्यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात आल्यावर त्याने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा तुमचे संभाषण आमच्याकडे रेकॉर्ड आहे. तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे पैशांची मागणी केली. तेव्हा त्याने वडिलांच्या पेन्शनचे आलेले पैसे असे एकूण १८ लाख ३७ हजार ६०० रुपये दिले. तरीही त्यांची मागणी आणि धमकावणे सुरू राहिल्याने त्यांनी शेवटी पोलिसांकडे धाव घेतली. पोलीस निरीक्षक वाघमारे अधिक तपास करीत आहेत.