पुणे : आमदार माधुरी मिसाळ यांच्या वानवडी येथील फेअर रोडवरील बंगल्यातून १८ लाख रुपयांचे हिरे व सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी महिला कामगारांवर संशय व्यक्त केला आहे.
याप्रकरणी ममता दीपक मिसाळ (वय ५१, रा. फेअर रोड, वानवडी) यांनी वानवडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
या फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे की, आमदार माधुरी मिसाळ व आम्ही सर्व जण एकत्र राहतो. बंगल्यामध्ये कामासाठी नोकर असून साफसफाई, धुणीभांडी व इतर कामांसाठी ७ महिला नोकर आहेत. शयनकक्षांची साफसफाई या महिला नोकर करतात. २८ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता माझ्या शयनकक्षातील दागिन्यांपैकी हिऱ्याचा एक हार, मोत्यांचे नक्षीकाम असलेला एक सोन्याचा हार आणि हिरे-माेत्यांची कलाकुसर असलेला सोन्याचा कडा तिजोरीतल्या डब्यात मिळून आला नाही. हा प्रकार त्यांनी पती दीपक यांना सांगितला. त्यानंतर माधुरी मिसाळ यांनाही सांगितले. सर्वांनी सोन्याच्या दागिन्यांचा डबा शोधला. परंतु, तो मिळाला नाही.
१८ ते २८ नोव्हेंबर या दरम्यान १४ लाख रुपयांचा हिऱ्याचा हार आणि ४ लाख रुपयांचा हिरे-मोती असलेला हार असा १८ लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला असल्याची फिर्याद देण्यात आली आहे. याबाबत वानवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी सांगितले की, सोन्याचे दागिने ठेवलेला डबा एक तर घरातच गहाळ झाला असावा अथवा घरात काम करणाऱ्या कामगारांपैकी कोणीतरी चोरला असण्याची शक्यता आहे. बाहेरुन कोणी येऊन चोरी करुन गेला नसल्याचे आत्तापर्यंतच्या तपासात दिसून आले. महिला कामगारांकडे चौकशी करण्यात येत आहे.