पुणे : सोशल मिडियावर झालेल्या ओळखीतून एका महिलेला परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी १८ लाख १२ हजार रुपयांचा गंडा घातला.
याबाबत वानवडी भागातील एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या महिलेला चोरट्याने फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून ओळख वाढविली. चोरट्याने परदेशातील एका बड्या कंपनीत आधिकारी असल्याची बतावणी महिलेकडे केली होती. महिलेला परदेशातून भेटवस्तू पाठविण्याचे आमिष चोरट्याने दाखविले होते. त्यानंतर परदेशातून पाठविण्यात आलेल्या भेटवस्तू विमानतळावर सीमाशुल्क विभागाने (कस्टम) ताब्यात घेतल्याची बतावणी चोरट्याने केली होती. भेटवस्तू सोडविण्यासाठी काही रक्कम तातडीने भरावी लागेल, असे सांगून चोरट्याने त्याच्या साथीदारांचे बँक खात्यांचे क्रमांक दिले.
त्यानंतर महिलेला या खात्यांवर पैसे भरण्यास सांगितले. महिलेने शहानिशा न करता वेळोवेळी खात्यावर पैसे जमा केले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महिलेने तक्रार दिली. पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर तपास करत आहेत.
---