पुणे: बँकेतून बोलत असल्याचे भासवून बँक अकाउंट बंद होण्याची भीती दाखव फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी मंगळवार पेठेत राहणाऱ्या एका व्यक्तीने मंगळवारी (दि. १९) पोलिसांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा प्रकार ११ ऑक्टोबर ते १२ ऑक्टोबर २०२३ यादरम्यान घडला आहे. फिर्यादीत म्हटल्यानुसार तक्रारदार यांना अज्ञात मोबाईल क्रमांकावरून फोन आला. बँकेतून बोलत असल्याचे भासवून तुमचे पॅन कार्ड बँकेच्या खात्याला लिंक नाही असे सांगितले. पॅन कार्ड लिंक केले नाही तर खाते बंद होईल अशी भीती दाखवली. त्यानंतर एनी डेस्क अप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगितले. तक्रारदार यांच्या डेबिट कार्डची माहिती घेऊन त्यांच्या खात्यातून १८ लाख ६५ हजार रुपये परस्पर ट्रान्स्फर करून घेतले. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारकावर माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वाघमारे करत आहेत.