शेलपिंपळगाव : भावाच्या खुनाचे सोशल मिडीयावर स्टेटस ठेवल्याच्या रागातून एका तरुणाने त्याच्या साथीदारांसोबत मिळून १८ वर्षीय मुलाचे अपहरण करून खून केला. तसेच मृतदेहाची विल्हेवाट लावली. तरुणाचा खून लपविण्यासाठी त्याचे दृश्यम स्टाईलने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडत आरोपींचे पितळ उघड केले आहे.
रासे फाटा (ता. खेड) येथील मराठा हॉटेलमध्ये दहा दिवसांपूर्वी हॉटेल मालक स्वप्नील उर्फ सोप्या संजय शिंदे याच्यावर काही जणांनी गोळीबार केला. त्यात स्वप्नील शिंदे जखमी झाला होता. याप्रकरणी राहुल पवार (रा. महाळुंगे इंगळे, ता. खेड), अजय गायकवाड आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात पोलिसांनी सुरुवातीला अजय गायकवाड याला अटक केली. त्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी अनोळखी आरोपीची ओळख पटवून अमर नामदेव शिंदे (वय २५, रा. कासार आंबोली, ता. मुळशी) याला अटक करण्यात आली. तर त्या गुन्ह्यात मुख्य आरोपी राहुल पवार हा अद्याप फरार आहे.
दरम्यान आरोपी राहुल पवार याचा भाऊ रितेश पवार याचा मागील तीन महिन्यांपूर्वी खून झाला आहे. त्या गुन्ह्यात स्वप्नील शिंदे याचा सहभाग असल्याचा संशय राहुल पवार याला होता. त्यामुळे त्याने अभिजित सदानंद मराठे (रा. कोथरूड, पुणे) आणि इतर साथीदारांसोबत मिळून स्वप्नील शिंदे याच्यावर गोळीबार केला होता. मात्र त्यापूर्वी दोन दिवस अगोदर आरोपींनी आदित्य युवराज भांगरे (वय १८, रा. भांगरे वस्ती, महाळुंगे, ता. खेड) याचा खून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. राहुल पवार याचा भाऊ रितेश पवार याचा खून झाल्यानंतर त्याचे खुनाचे छिन्नविच्छिन्न फोटो आदित्य भांगरे याने सोशल मिडीयावर स्टेट्सला ठेवले होते. त्याचा राग राहुल पवार याच्या डोक्यात होता. त्यावरून राहुल पवार याने दोन साथीदारांसोबत मिळून १६ मार्च रोजी आदित्य भांगरे याचे कारमधून अपहरण केले. त्याला मारहाण करून वायरने गळा आवळून त्याचा कारमध्येच खून केला होता. आदित्य भांगरे याचा खून करून त्याचे पुरावे आरोपींनी नष्ट केले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपींनी खेड तालुक्यातील निमगाव येथे एका निर्जनस्थळी काहीतरी जाळले. तिथे आदित्य भांगरे याचा मृतदेह जाळला असल्याचा बनाव आरोपींनी केला. तसेच आदित्यचा मोबाईल गोवा येथे एका आरोपीसोबत पाठवला. त्यामुळे तांत्रिक विश्लेषणात आदित्य गोवा येथे असल्याचे दिसत होते. दोन्ही ठिकाणी आदित्यचा मृतदेह अथवा त्याबाबत कोणताही ठोस पुरावा सापडला नाही. मृतदेह सापडला नाही तर त्याचा आरोपींना न्यायालयात फायदा होईल असा विचार आरोपींनी केला. मात्र पोलिसांनी त्यापुढे जाऊन आरोपींनी आदित्याचे जिथून अपहरण केले तिथले सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून आरोपी ज्या मार्गाने गेले त्याचा माग काढला. आरोपींनी आदित्य भांगरे याला गाडीतच ठार मारून त्याचा मृतदेह महाराष्ट्र - गुजरात सीमेवर असलेल्या वेलवाडा येथे एका जंगल परिसरात जाळले होते. आदित्यच्या बेपत्ता झाल्याची तक्रार महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल होती. पोलिसांनी वेलवाडा येथून अर्धवट जळालेला मृतदेह ताब्यात घेतला आहे. मृतदेह ओळख पटविण्याच्या अवस्थेत नसल्याने त्याची डीएनए तपासणी करून ओळख पटवली जाणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.