लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : चित्रपटप्रेमींसाठी खूशखबर, कोरोनाचे सावट असले, तरी पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव( पिफ) यंदा तितक्याच उत्साहात रंगणार आहे. येत्या ४ ते ११ मार्चदरम्यान पिफ प्रत्यक्ष आणि ऑनलाइन अशा दोन्ही स्वरूपात रसिकांसमोर येणार आहे.
पुणे फिल्म फाउंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ.जब्बार पटेल यांनी बुधवारी (दि. २०) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यापूर्वी पिफच्या तारखा १४ ते २१ जानेवारी अशा घोषित करण्यात आल्या होत्या, परंतु गोवा आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही १६ ते २४ जानेवारीदरम्यान असल्याने पिफ पुढे ढकलण्यात आला. यंदाच्या ‘पिफ’साठी ९३ देशांमधून १ हजार ६११ चित्रपट आले. यातल्या १८० निवडक चित्रपटांचा आस्वाद सिनेरसिकांना घेता येणार आहे.
“चित्रपटगृहाबरोबरच ऑनलाइन माध्यमातून यंदाचा महोत्सव होणार आहे. कोविड काळात जिवाची बाजी लावणाऱ्या ‘फ्रंटलाइन वॉरियर्स’ना यंदा हा महोत्सव समर्पित केला जाणार आहे,” असे डॉ.जब्बार पटेल यांनी सांगितले. शासनाकडून पिफला ७० लाख रुपयांचे अनुदान दिले जात होते. त्यातली २० लाख रुपयांची रक्कम शासनाच्या पुरस्कारांसाठी वापरली जात असे. त्यामुळे पिफसाठी किमान ४ कोटी रुपये मिळावेत, अशी मागणी शासनाकडे केली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अडीच कोटी रुपये इतकेच अनुदान देण्याची विनंती आम्ही स्वतःहून राज्य सरकारकडे केली. ती सरकारने स्वीकारली, असेही डॉ.पटेल म्हणाले.
चौकट
यंदा लातूरताही ‘पिफ’
दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्याच्या इतर शहरांमध्ये चित्रपट महोत्सव आयोजित केला जाणार आहे. यंदा मुंबई, नागपुरासोबत लातूर येथेही चित्रपट महोत्सव आयोजित केला जात आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या गावी लातुरात मार्चच्या शेवटच्या आठवड्यात हा महोत्सव होईल, असे डॉ.जब्बार पटेल यांनी सांगितले.