पुणे : पुणे मेट्रो प्रकल्पासाठी फे्रंच डेव्हलपमेंट बँके(एएफडी)च्या वतीने १८०० कोटी रुपये (२४५ मिलियन युरो) कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, पुढील चार महिन्यांत या प्रस्तावाला मान्यता देण्यात येणार असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले.मेट्रो प्रकल्पाची पाहणी करण्यासाठी फ्रेंच डेव्हलपमेंट एजन्सीच्या शिष्टमंडळाने भेट दिली. या शिष्टमंडळामध्ये एजन्सीचे संचालक निकोलस मायकल बर्नार्ड, वाहतूक विभाग प्रकल्प प्रमुख मॅथ्यु वेरडूर आणि प्रकल्प प्रमुख रजनीश अहुजा सहभागी झाले होते. या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड ते रेंज हिल्स आणि शिवाजीनगर न्यायालय ते रामवाडी या दोन्ही प्रस्तावित मार्गांची पाहणी केली. या वेळी डॉ. ब्रिजेश दीक्षित व महामेट्रोचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम् उपस्थित होते.दीक्षित म्हणाले, ‘पुणे मेट्रो प्रकल्पासाठी एकूण ११ हजार ४२० कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यामध्ये निम्मा खर्च केंद्र आणि राज्य सरकार व दोन्ही महापालिका करणार आहेत, तर उर्वरित निधी कर्जांच्या माध्यमातून उभा करण्यात येणार आहे. सुमारे ६ हजार २०० कोटी रुपयांचे कर्ज उभारण्यात येणार आहे.यापैकी ४ हजार ५०० कोटी रुपयांचे कर्ज युरोपियन इन्व्हेस्टमेंट बँकेने देण्याची तयारी दाखवली आहे, तर उर्वरित १८०० कोटी रुपये कर्ज आता फ्रेंच डेव्हलपमेंट बँकेकडून मिळणार आहे. निधीचा प्रश्नमार्गी लागला असून, कामाला अधिक गती येईल.’वनाझ-शिवाजीनगर मेट्रोचे काम दोन आठवड्यांत सुरूपिंपरी-चिंचवड ते रेंज हिल्स या मार्गा पाठोपाठ आता वनाझ ते शिवाजीनगर या मार्गाचे कामदेखील येत्या दोन आठवड्यांत सुरु होणार आहे. यासाठी आलेल्या निविदांची छाननी करून एका आठवड्याच्या आत निविदा अंतिम करण्यात येईल. त्यानंतर त्वरित या मार्गाचे काम सुरु करण्यात येणार आहे. वनाझ ते शिवाजीनगर न्यायालय हा ७. १५ किलोमीटरच्या मार्गावर जागा ताब्यात असलेल्या ठिकाणी त्वरित काम सुरू करण्यात येणार असल्याचे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी येथे सांगितले.
पुणे मेट्रोसाठी १८०० कोटींचे कर्जॉ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 3:18 AM